होमपेज › Pune › चित्रपटाच्या सेटप्रकरणी विद्यापीठाला कारणे दाखवा

चित्रपटाच्या सेटप्रकरणी विद्यापीठाला कारणे दाखवा

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 09 2018 12:34AMपुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नियमबाह्य पद्धतीने चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिले आहे. यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि प्रशासनावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात यावी, तसेच येत्या सात दिवसांमध्ये जर यासंदर्भात विद्यापीठाने कारवाई केली नाही तर चित्रपटाचा सेटच जप्त करावा, असे स्पष्ट आदेश उच्च शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाला  दिले आहेत.

आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी विद्यापीठातील वसतिगृह, मेस आणि इतर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित केले होते. त्याअनुषंगाने वायकर यांनी विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी विद्यापीठ परिसराला भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मेधाताई कुलकर्णी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, सहसंचालक डॉ. विजय नारखेडे आदी उपस्थित होते.वायकर म्हणाले, की विद्यापीठाने चित्रपटाचा सेट उभारण्यासाठी प्रशासनाच्या आवश्यक परवानग्या न घेताच खेळाचे मैदान चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. यासंदर्भातील माहिती विद्यापीठात आल्यानंतर घेतली आहे. विद्यापीठाने शूटिंगसाठी मैदान भाड्याने देण्याबाबत मंजुळे यांच्यासोबत केलेल्या कराराची मुदत 30 डिसेंबरला संपली होती. आता फेब्रुवारी महिन्याची सात तारीख उजाडली आहे. सरकारची जागा मंजुळेंना देण्यासाठी विद्यापीठाने शासनाची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, विद्यापीठाने परवानगी घेतलेली नाही. त्यामुळेे कुलगुरू डॉ. करमळकर आणि संबंधित प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. 

कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. मी असो किंवा इतर. उद्या एखाद्या पार्टीने जागा मागितली तर तुम्ही देणार का?  विद्यापीठातील विद्यार्थी असतील त्यांना तुम्ही देणार का? तसे होत नाही. कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. जे कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणेच योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- रवींद्र वायकर, राज्यमंत्री, 
उच्च व तंत्रशिक्षण