Tue, Apr 23, 2019 14:27होमपेज › Pune › पाणी बचत करा; अन्यथा कपात करावी लागेल

पाणी बचत करा; अन्यथा कपात करावी लागेल

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 1:47AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पाण्याची उधळपट्टी केली जात आहे. वारंवार सांगूनही पालिका मैला-सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करीत नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास पालिकेस करण्यात येणार्‍या 30 एमएलडी पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पालिकेस दिला आहे.  

एमआयडीसीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहराला दररोज 30 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्य:स्थितीमध्ये एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच, नव्याने विकसित होणार्‍या चाकण औद्योगिक परिसरातून उद्योजकांकडून पाण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे शहर औद्योगिक परिसरात पाणीपुरवठा करताना अनेक अडचणी येत आहेत. उद्योजकांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचा तक्रारी येत आहेत, असे एमआयडीसीने पत्रात म्हटले आहे.

शहरातील औद्योगिक परिसरातील रहिवासी क्षेत्र तसेच, उद्योजकांकडून पाण्याची मागणी वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी मैला-सांडपाणी शुद्धिकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, बगिचा, रोपवाटिका, बांधकाम आदींना वाटप केल्यास शुद्ध पाण्यात बचत होणार आहे. पाणीबचतीसंदर्भात पालिकेस वारंवार सांगूनही अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. या संदर्भात तत्काळ कारवाई करावी, अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा इशारा एमआयडीसीने दिला आहे. हे इशारावजा पत्र एमआयडीसीने 8 नोव्हेंबर 2017 ला पालिकेस पाठविले आहे. अद्याप त्यावर पालिकेने कोणतेही कारवाई केली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

दरम्यान, पवना धरणापेक्षा अधिक दराने एमआयडीसीकडून पाणी न घेण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिकेकडे केली होती. मात्र, शहराला पाणीसाठ्याचे इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने एमआयडीसीकडून पाणी घेत असल्याचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले होते.