Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › साडेआठ वर्षांच्या मावळ्याची ५३ किल्ल्यांवर चढाई

साडेआठ वर्षांच्या मावळ्याची ५३ किल्ल्यांवर चढाई

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:56AMपिंपरी : पूनम पाटील 

सध्याची पिढी ही दिवसेंदिवस मोबाईल तसेच इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली असताना अवघे साडेआठ वर्षे वय असलेला सत्यम ठुबे याने मात्र दुर्गभ्रमंतीचा छंद जोपासला आहे. सहा जून 2016 ला शिवराज्याभिषेकदिनी रायगडावर महाराजांना मुजरा करून या चिमुकल्याने दीड वर्षात 53 किल्ले सर केले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी तो छत्रपती शिवरायांचा पराक्रम जाणून घेण्यासाठी दुर्ग अभ्यास मोहिमेत गर्क असून वर्षभरात शंभर किल्ले चढण्याचा त्याचा मानस आहे. 

सत्यम ठुबे हा केंद्रीय विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून मागील दीड वर्षापासून त्याने दुर्गभ्रमंती सुरू केली आहे. सत्यमचे वडील विजय ठुबे हे व्यवसायाने शिक्षक असून पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणसंवर्धन मोहिमेत त्यांचा लक्षणीय सहभाग असतो.  आजवर त्याने सुधागड, सरसगड, तैलबेला, घनगड, विसापूर, शिवनेरी, शहागड, रामशेज नाशिक, कन्हेरी गड, मल्हारगड, पुरंदर, केंजळगड, रायरेश्‍वर यासह देशातील  विविध गडकिल्ल्यांवर चढाई केली आहे.  या मोहिमेत सर्वात अवघड किल्ला धोडप किल्ला होता. सलग पाच तास पायपीट केल्यानंतर हा किल्ला पाहता आला, तर सर्वात सोपा म्हणाल तर कोकण, मानगड, तळगड, घोसाळगड, अवचितगड असा 4 किल्ल्यांचा ट्रेक एकाच दिवशी पार पडल्याचा अनुभव सत्यमने सांगितला. कधी ऊन तर कधी पाऊस तसेच थंडीवार्‍याचा सामना करत रात्रभर प्रवास तर दिवसा ट्रेक असा दिनक्रम राखत सत्यमने जिद्दीने किल्ले चढले आहेत. शाळा सांभाळून जमेल तसे ट्रेक करत आजवर त्याने 53 किल्ले चढले आहेत.  

प्रत्येक किल्ल्याचा इतिहास हा प्रेरणादायी असून पुढील मोहिमेसाठी आपल्याला बळ देत असल्याचे सत्यम सांगतो. छत्रपती शिवरायांचा पराक्रम हा प्रेरणादायी असून पालकांनी आपल्या मुलांनाही त्यांचा इतिहास दुर्गभ्रमंतीद्वारे सांगावा, अशी अपेक्षा सत्यमच्या पालकांनी व्यक्क केली आहे.