Tue, Jul 16, 2019 22:37होमपेज › Pune › सतेज पाटील यांनी भाजपमध्ये जावे

सतेज पाटील यांनी भाजपमध्ये जावे

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 14 2018 1:06AMपिंपरी : प्रतिनिधी

आ. सतेज पाटील यांनी आता भाजपमध्ये जावे, असा सल्ला डॉ. डी. वाय. पाटील यांनी येथील एका कार्यक्रमात दिला आणि सारे एकदम अवाक् झाले. त्यावर तुम्ही इकडे (भाजप) आलात किंवा तिकडे (काँग्रेस) राहिलात तरी फायदा आमचाच आहे, अशी कोपरखळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारली तेव्हा एकच हशा पिकला. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा प्रथम स्वागत  समारंभ सोहळा विद्यापीठाच्या शांताई सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये खासगी विद्यापीठाची स्थापना म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी ग्वाही दिली. तसेच सतेज पाटील यांनी भाजपामध्ये जावे अशी इच्छाही व्यक्त केली.  

तावडे म्हणाले की, सतेज पाटील हे मागच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. काँग्रेसचे सरकार असून देखील त्यांना विद्यापीठ मिळविता आले नाही. त्यासाठी भाजपचे विनोद तावडे यावे लागले आणि हीच इच्छा येथून पुढे ठेवा म्हणजे पुढील काळात तुम्हाला आणखी विद्यापीठे काढता येतील. दादांचा (डॉ. डी. वाय. पाटील) सल्ला ऐका अगर ऐकू नका आमचा फायदाच आहे. इकडं आलात तरी फायदा आहे. तिकडं राहिलात तरी आमचा कोणतरी तिकडे आहे याचाही आम्हाला फायदा आहे, असे उद‍्गार काढले.

‘ओपन बूक एक्झाम’  पद्धत आणायची आहे : तावडे

शाळांमध्ये सध्या जो अभ्यासक्रम आहे तो घोकंमपट्टीचा आहे. आता समजविण्यावर भर देण्यात येणार आहे. एका प्रश्‍नाचे एकच उत्तर असणे ही घोकंमपट्टी आहे. त्यामुळे मूल्यांकनप्रणाली बदलणे गरजेचे आहे. शिक्षणामध्ये फक्त माहिती दिली जाते त्यातून ज्ञान मिळत नाही. परीक्षेची पद्धत बंद करून मला ‘ओपन बुक एक्झाम सिस्टिम’ आणायची आहे, असे उद‍्गार राज्याचे उच्च तंत्र व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.  विनोद तावडे म्हणाले की, ‘ओपन बुक एक्झाम सिस्टिम’ ही सिस्टिम ज्यावेळी आपल्या देशात येईल तेव्हा कोणत्याही आयसीएस, सीबीएसई पॅटर्न पद्धतीमध्ये फरक राहणार नाही. त्याअर्थी विद्यार्थ्याने विषय समजून घेतला पाहिजे. नाही तर अकरावीतून बारावीत गेला की पुढचे पाठ मागचे सपाट होते. त्यामुळे नीट व सीईटीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना अवघड जातात. कारण तो अकरावी विसरलेला असतो. आणि आता आपण अकरावीचा एखादा विषय सुरू केला की तो बारावीपर्यंत चालेल अशा पद्धतीने आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत.