Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Pune › ससूनच्या तंत्रज्ञ, परिचारिकांना सहा महिने संप करता येणार नाही 

ससूनच्या तंत्रज्ञ, परिचारिकांना सहा महिने संप करता येणार नाही 

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 10 2018 1:14AMपुणे ः प्रतिनिधी

ससून रुग्णालयातील डॉक्टरांसोबत रुग्णसेवा करणारे  तंत्रज्ञ, परिचारिका यांना राज्य शासनाने अखेर ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011 (मेस्मा) च्या अखत्यारित आणले आहे. याबाबत 6 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या 

राजपत्रातील अधिसूचनेनुसार 7 जुलैपासून पुकारलेला संप अनधिकृत ठरविण्यात आला होता. अधिसूचनेनुसार तंत्रज्ञ, परिचारिकांना यापुढे सहा महिने संपावर जाता येणार नाही. यापूर्वी केवळ डॉक्टरांनाच ‘मेस्मा’ लागू होता. 

ससूनमधील परिचारिकांनी प्रशासकीय कारणास्तव झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी 4 जुलैपासून कामबंद आंदोलन केले होते. तसेच कामबंद आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने 3 जुलै रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात राज्य सरकारने रुग्णांचे हित विचारात घेता ‘मेस्मा’ परिचारिका आणि संंबंधित कर्मचारी यांनादेखील लागू करणे आणि संप करण्यास बंदी घालण्याबाबत निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले होते. 

या संपाच्या निर्णयाची खात्री झाल्याने राज्य शासनाने  कर्मचार्‍यांना संंपावर जाण्यास मनाई केली आहे. त्यासंबंधीचा अध्यादेश राजपत्रात प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत दिली. चार  जुलै  रोजी 84  परिचारिका कामावर उशिरा आल्या आहेत. तसेच संप  मागे घेत असल्याबाबत अजूनही औपचारिकपणे रुग्णालय प्रशासनाला काही कळविलेले नाही. दरम्यान, शासनाने आता त्यांना मेस्मा लागू केला आहे. संपकर्‍यांबाबत त्यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.