Fri, Apr 26, 2019 03:47होमपेज › Pune › महिला मृत्यू तपासणीसाठी ससूनची समिती

महिला मृत्यू तपासणीसाठी ससूनची समिती

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या मार्च महिन्यात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. यामध्ये मांत्रिक आणून जादूटोणा केल्याचा प्रकारही घडला होता. पण, यातील महिलेचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला आहे, की नाही याची तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयातील पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. अलंकार पोलिसांनी ससूनला याबाबत पत्र दिले आहे. 

संध्या गणेश सोनवणे, वय 24, रा. दत्‍तवाडी, सिंहगड रोड या महिलेचा 11 मार्चला एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्याने त्या उपचार घेत होत्या. यानंतर संध्याचा भाऊ महेश जगताप यांनी रुग्णालयाबाहेरील खासगी डॉक्टर डॉ. सतीश चव्हाण याने दीनानाथच्या आयसीयूमध्ये मांत्रिक बोलावून मंत्र-तंत्र व उतारा केला असल्याचा व्हिडिओ दाखवून एकच खळबळ उडवून दिली होती. मांत्रिक प्रकरणावरून खूप वादंग झाले होते; तसेच नातेवाईकांनी मांत्रिक आणि त्याला घेऊन येणारा डॉ. सतीश चव्हाण यांच्याविरुध्द अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

दीनानाथमध्ये दाखल करण्यापूर्वी संध्या या स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे उपचार घेत होत्या. येथील उपचाराबाबत संशय असल्याने संध्याचा भाऊ महेशने मांत्रिक प्रकरणाबरोबरच उपचारामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा (मेडिकल निग्लिजंस) झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी हे प्रकरण ससूनच्या मेडिकल बोर्डकडे पाठवले. 

संध्या यांच्या सुरुवातीपासून उपचारांची माहिती घेऊन त्यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का नाही हे ठरवणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. 
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी करून तसा अहवाल उपसंचालकांना पाठवला होता. 

समितीमध्ये हे आहेत पाच तज्ज्ञ

वैद्यकीय निष्काळजीपणाची पडताळणी करण्यासाठी ससूनच्या पाच तज्ज्ञांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यामध्ये न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख (डॉ. एस. बी. पुनपाळे), औषधशास्त्र विभागाचे विभागप्रमुख (डॉ. शशीकला सांगळे), भूलतज्ज्ञ विभागाचे प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि समितीचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधीक्षक (डॉ. अजय तावरे) यांचा समावेश आहे.