Mon, Apr 22, 2019 03:54होमपेज › Pune › ससूनच्या परिचारिकांचा संप स्‍थगित

ससूनच्या परिचारिकांचा संप स्‍थगित

Published On: Jun 18 2018 10:21AM | Last Updated: Jun 18 2018 11:53AMपुणे : प्रतिनिधी

ससूनमधील दहा परिचरिकांच्या केलेल्या बदलीच्या विरोधात ४५० परिचरिकांनी सुरू केलेला संप आज सकाळी अकरा वाजता आठ दिवसांसाठी स्थगित केला आहे. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शासनाकडे बदल्या रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितल्यानंतर हा संप स्थगित करण्यात आला.  

जर येत्या आठ दिवसात बदल्या रद्द झाल्या नाहीत तर पुन्‍हा संप करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नर्स फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी दिला आहे. आज सकाळपासून ससूनमधील सर्व ४५० परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णसेवा खोळंबली होती. पण प्रशासनाने तातडीने पावले उचलत हा संप स्थगित करण्यासाठी पाऊले उचलली

प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर असतानाच आता ससूनमधील सर्वच ४५० परिचारिकांनी आजपासून (दि. १८) संपामध्ये उडी घेतली आहे. दहा परिचारिकांची आकसातून बदली केली असून ती रद्‌द करावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपामुळे आगोदरच कोलमडलेली रुग्णसेवा आज अधिकच बिकट होणार आहे. 

 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन हे सहा हजारावरुन १७ हजार करावे या मागणीसाठी ससूनमधील दोनशे डॉक्टरांसह राज्यातील अडीच हजार डॉक्टर १३ जूनपासून संपावर आहेत. हा संप मिटला नसताना तीनही पाळ्यांमधील काम करणार्‍या परिचारिकांनी संपाची घोषणा केल्याने ससूनचे प्रशासन कात्रीत सापडले आहे. 

रुग्णांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये सुश्रृशा करण्याचा परिचारिकांचा महत्वाची भूमिका असते. मात्र संपामुळे रुग्णांचे अधिकच हाल होणार आहेत. येथील दहा परिचारिकांची बदली ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी केली. यामध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांना लक्ष्य केले आहे. याबाबत प्रशानापासून मंत्र्यांपर्यंत बदली रद्‌द करण्यासाठी विनंत्याही केल्या, परंतु बदली रद्द झाली नाही. सध्या ससूनमध्ये ६०० परिचारिकांच्या जागा आहेत त्यापैकी काही रिक्त तर काही सुट्टीवर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 

परिचारिका संघटनेच्या कार्यकर्त्या असलेल्या परिचारिकांची ससून प्रशासनाने आकसाने बदल्या केल्या आहेत. हे कामगार कायद्यानुसार चुकीचे आहे. त्यामुळे ससूनमधील अगदी तातडीच्या ठिकाणांवरील परिचारिका आजपासून संपावर आहेत. बदल्या रद्‌द करण्यासाठी संघटना विभागाचे मंत्री, सचिव यांच्या संपर्कात असल्याचे महाराष्ट्र राज्य नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी सांगितले.  तसेचे ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी परिचारिका संघटनेसोबत बैठक झाली असून त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. आज सकाळीच ते संप मागे घेण्याची घोषणा करतील. जर तसे नाही झाले तर पोलिसांची मदत घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.