Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › वरवंड परिसरात ‘सैराट’ फिवर! 

वरवंड परिसरात ‘सैराट’ फिवर! 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:06AMयवत : वार्ताहर

वरवंड परिसरात ‘सैराट’ फिवर आला असून प्रेमी युगुलांना आवर घालण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यांत या परिसरातून जवळपास 25 पेक्षा जादा प्रेमी युगुलांनी धूम ठोकली असून यात अल्प व किशोरवयीन मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

फेसबुक आणि व्हाट्स अ‍ॅपच्या अतिरेकामुळे मुली सहज मुलांच्या जाळ्यात फसत असून या गोष्टीचा मोठा मनस्ताप मुलीचे आई-वडील व कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. 18 वर्षे मोठ्या कष्टाने आई-वडील यांनी सांभाळलेली मुले काही क्षणात कुटुंबाचे उपकार विसरून जात असल्याने, त्या कुटुंबीयांना मोठा मानसिक आघात होत आहे. परंतु, कायद्याच्या बंधनात त्यांचा प्रेमविवाह पाहण्यापलीकडे कुटुंबीय काहीही करू शकत नाही हे सत्य आहे. वरवंड परिसरात यापूर्वी विकासकामात एकी दाखवणारा परिसर म्हणून परिचित होता.

कोणावरही अन्याय झाला तर संघटितपणे एकत्रित लढा देणारा परिसर अशी ओळख यापूर्वी या भागाची होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून या परिसरात प्रेमी युगुलांच्या धूम ठोकण्यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली आहे. प्रेमविवाहाला विरोध नाही, पण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना तो योग्य असावा व आपण आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी तो योग्य असावा, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत. हा सर्व प्रकार कुठेतरी थांबला पाहिजेत अशी चर्चादेखील दबक्या आवाजात सुरू असून, यात गावातील ज्येष्ठ मंडळींची पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी चर्चा होत आहे.


पोलिसांचा धाक राहिला नाही

वरवंड भागात महाविद्यालयामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरगावावरून विद्यार्थी या ठिकाणी येतात. महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी या परिसरात टोळकी उभी असतात. याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीदेखील अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु, पोलिस यात लक्षच देत नाहीत. परिणामी याचा गैरफायदा मुले उचलत असून असे प्रकार घडत आहेत.

समुपदेशनाचे वर्ग आवश्यक

या सर्व प्रकाराबाबत वरवंड गावचे पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी सांगितले की, आजकाल मुली जास्त वेळ शाळा कॉलेज, फेसबुक, व्हाट्स अ‍ॅपच्या सानिध्यात राहत असून आई-वडीलदेखील त्यांना कमी वेळ देत आहेत. असे प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी समुपदेशनचे वर्ग देखील आयोजित करण्यात यावेत.