Tue, Apr 23, 2019 23:30होमपेज › Pune › घरफोडी सराईत चोरट्यास अटक

घरफोडी सराईत चोरट्यास अटक

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:08AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने वाहनचोरी आणि घरफोडी करणार्‍या सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून दोन लाख दोन हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे, तर त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे. ही कारवाई अजमेरा नाना-नानी पार्क या ठिकाणी केली.

अजय भालेराव (20, रा. लालटोपीनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार अजमेरा येथील नाना-नानी पार्क येथे येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर यांच्या पथकाने सापळा रचला.

पोलिसांना पाहताच अजय हा पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी परिसरात घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार संजय तिर्के याच्या मदतीने दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्ह्यातील 39 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 18 हजार रुपये हस्तगत केले आहेत; तसेच या दोघांनी पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या 62 हजार 500 रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. संजय हा फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

गावठी कट्टा जप्त

मोहनगर कमानीजवळ एक संशयित आला असून, त्याच्याजवळ पिस्तूल असल्याची माहिती पोलिस कर्मचारी जावेद पठाण यांना खबर्‍यामार्फत मिळाली. वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. संशयित दिसताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव महेश ऊर्फ भावड्या गौतम शिंदे (22, रा. कासारवाडी) असल्याचे स्पष्ट झाले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा लोखंडी धातूचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळून आला.