Wed, Nov 14, 2018 21:02



होमपेज › Pune › पुण्याच्या संपन्न शेलारचा बांगला खाडी पार 

पुण्याच्या संपन्न शेलारचा बांगला खाडी पार 

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:08AM



पुणे : प्रतिनिधी

पुण्याच्या संपन्न रमेश शेलार या 17 वर्षीय जलतरणपटूने बांगला खाडीचे अंतर दुहेरी पद्धतीने पोहून पार केले. अशा प्रकारे पोहणारा संपन्न हा जगातील एकमेव जलतरणपटू आहे. संपन्नने बांग्लादेश येथील समुद्रामध्ये सेंट मार्टीन्स आयलँड ते टेकनॅफ जेट्टी आणि परत सेंट मार्टिन्स आयलँड हे 32.2 किलोमीटरचे सागरी अंतर 9 तास 10 मिनीटांमध्ये यशस्वीरीत्या पार केले. शुक्रवार, दि. 30 मार्च रोजी त्याने ही कामगिरी केली, अशी माहिती त्याचे मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी प्रशिक्षक हर्षद इनामदार, संपन्न शेलार, रमेश शेलार, शारदा शेलार आदी उपस्थित होते. बांगलादेशच्या मुसा इब्राहिम यांच्या एव्हरेस्ट अ‍ॅकेडमी यांंनी या मोहिमेचे आयोजन केले. संपन्नने 30 मार्च रोजी सेंट मार्टीन्स आयलँडच्या किनार्‍यावरुन सकाळी 5 वाजून 40 मिनिटाने पोहायला सुरुवात केली. पहिल्या तासामध्ये त्याने 5 किलोमीटर अंतर पार केले. परंतु पुढच्या तासामध्ये वारा अनुकूल नसल्याने त्याचा वेग मंदावला. टेकनॅफ बंदरापर्यंतचे 16.1 किलोमीटर अंतर त्याने 3.45 मिनिटात पोहणे अपेक्षित होते. परंतु वार्‍याचा वेग ताशी 25 किमी असा वाढल्याने त्याला पहिला टप्पा म्हणजे 16.1 किमी अंतर पार करण्याकरीता 5 तास लागले. बरोबर 10 वाजून 40 मिनिटाने संपन्नने निम्मे अंतर पार केले. 10 मिनिटे विश्रांती घेऊन 10 वाजून 50 मिनिटांनी त्याने परत पोहायला सुरुवात केली. 

परतीच्या प्रवासात वार्‍याचा फायदा घेत संपन्नने 16.1 किलोमीटर अंतर बरोबर 4 तासात पार केले. परतीच्या वेळी वार्‍याचा जोर वाढला होता. मात्र पाण्याखालील वातावरण अनुकूल होते. 2 वाजून 50 मिनिटांनी त्याने मोहीम पूर्ण करीत पाय टेकवले. सेंट मार्टीन्स आयलँड पोहताना संपन्नने दर 45 मिनिटाला नारळपाणी, चॉकलेट, केळी असा आहार घेतला, अशी माहिती खासनीस यांनी दिली. संपन्न हा एशियन कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्समध्ये इयत्ता 11 वी मध्ये शिकतो. तो शार्क अ‍ॅक्वेटीक क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस आणि हर्षद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. सकाळी 2 तास आणि सायंकाळी 3 तास तसेच शनिवार आणि रविवारी सलग 8 तास तो सराव करतो. संपन्नने यापूर्वी 4 वैयक्तिक पोहण्याचे विक्रम केले आहेत. परदेशातील हा त्याचा पहिला प्रयत्न होता.