Tue, Apr 23, 2019 21:46होमपेज › Pune › ‘सवाई’ची वाहतूककोंडी फुटली

‘सवाई’ची वाहतूककोंडी फुटली

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:43AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बेशिस्त पार्किंगमुळे शनिवारी (दि. 17) संवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला रमणबाग, नारायण पेठ, परिसरात वाहतूकोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक विभागाने 60 वाहनांना जॅमर लावून कारवाई केली होती. 

दरम्यान, रविवारी वाहनांचे पार्किंग सुस्थितीत करण्यात आले होते. परिणामी नागरिकांना वाहतूककोंडीचा मनस्ताप कमी प्रमाणात जाणवला. रविवारी महोत्सवाला आलेल्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी डेक्कन वाहतूक विभागाच्या वतीने 100 कर्मचारी आणि 9 अधिकार्‍यांच्या मार्फत वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. 

शहरात रमणबाग परिसरात 65 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील एक ते दोन दिवसांपासून रमणबाग, नारायण पेठ, लोकमान्य टिळक चौक परिसरात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. महोत्सवाला येणार्‍या रसिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे परिसराला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. दरम्यान, शनिवारी रमणबाग परिसरात वाहतूककोंडीने स्थानिकांसह वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, डेक्कन वाहतूक विभागाच्या वतीने रविवारी कार्यक्रमाला येणार्‍या रसिकांच्या वाहनांचे पार्किंगचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग सुरळीत राहण्यास मदत झाली.
    तर दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांमुळे फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, टिळक रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूकीचा वेग मंदावला होता. 

परिणामी सायंकाळी सातनंतर काही भागात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. वाहतूक पोलिसांच्या मदतीने बहुतांश वाहतूककोंडी फोडण्यास मदत केली जात असल्याचे दिसून आले.