होमपेज › Pune › ‘तो’ ठाण्यात, पोस्टर पुण्यात; तरीही गुन्हा!

‘तो’ ठाण्यात, पोस्टर पुण्यात; तरीही गुन्हा!

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

गर्दी खेचण्यासाठी सहकारनगरातील अरण्येश्‍वर दहीहंडी मंडळाने अभिनेता संतोष जुवेकरचे पोस्टर लावले. जोश आणि जल्लोषात दहीहंडी झाली खरी; पण वाहतुकीला अडथळा झाला म्हणून पोलिसांनी मंडळाबरोबर जुवेकरवरही गुन्हा दाखल केला. संतापलेल्या जुवेकरने कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतल्याने फक्‍त पोस्टरवर फोटो पाहून गुन्हा दाखल  करणार्‍या पुणे पोलिसांचे हसे झाले आहे.

दहीहंडी मंडळाने बेकायदेशीर मंच उभारला होता आणि स्पीकरही लावले होते. एका फ्लेक्सवर जुवेकरचा फोटो होता. पोलिसांनी तेथे नागरिकांकडे विचारपूस केली असता जुवेकर अभिनेता आला असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हा दाखल केला.    

गुन्ह्यातून नाव वगळणार

स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी सांगितले की, स्टेजवरील हिरोसारखा मुलगा गर्दीला आकर्षित करत होता. पोलिसांनी पोस्टरवरून गुन्हा दाखल केला. जुवेकरबाबात विचारपूस करू. ते आले नसतील तर त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात येईल. 

मी घरी होतो

सकाळी गुन्हा दाखल झाल्याचे समजले, पण मी पुण्यात नव्हतोच. मी माझ्या ठाण्यातील घरी होतो. हे मंडळ कोणते आहे, हेही मला माहीत नाही किंवा त्यांच्यातील कोणाचाही संबंध नाही. त्यामुळे आमंत्रण किंवा कराराचा संबंध नाही. मी नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने मनस्ताप झाला आहे. वकिलांशी बोलून कायदेशीर कारवाई करणार आहे.  -संतोष जुवेकर