Wed, Aug 21, 2019 20:03होमपेज › Pune › वैष्णवांचे अपूर्व उत्साहात स्वागत

वैष्णवांचे अपूर्व उत्साहात स्वागत

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:39AMपुणे ः प्रतिनिधी 

खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळा, कपाळी बुक्‍का, मुखात हरिनामाचा जयघोष करत लाखो वैष्णवांच्या मेळ्यासह जगद‍्गुरू तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि. 7) पुणे शहरात दिमाखात आगमन झाले. शहरवासीयांनी या वैष्णवजणांचे अपूर्व उत्साहात स्वागत केले. भजने, हरिपाठ, टाळ-मृदंगांच्या तालावर नाचत मार्गक्रमण करणार्‍या वारकर्‍यांमुळे अवघे शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. 

विणेकरी, पखवाज वादक, पताकाधारी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला व टाळकरी अशा दिमाखात संत तुकाराम आणि ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालख्या शहरात दाखल झाल्या. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्या काढून जल्लोषी पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच वारकर्‍यांच्या स्वागताला  वरुणराजानेही दिवसभर हजेरी लावली.

संत तुकोबा महाराजांची पालखी शुक्रवारी (दि. 6) आकुर्डी मुक्कामी होती. शनिवारी (दि. 7 ) सकाळीच ती पुणे मुक्‍कामासाठी  मार्गस्थ झाली, तर माउलींची पालखी शुक्रवारी मार्गस्थ होऊन रात्री आळंदीतील गांधीवाड्यात मुक्कामी होती. शनिवारी सायंकाळी दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात आगमन होणार असल्याने सकाळपासूनच पुणेकर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. वारीच्या वाटेवर असलेलेे अनेक वारकरी शहरात सकाळपासून दाखल होत होते. शहरात ठिकठिकाणी वारकर्‍यांच्या नाष्टा व भोजनाची व्यवस्था संस्था, संघटनांकडून करण्यात आली होती.

शहराच्या प्रत्येक चौकामध्ये पालख्यांच्या स्वागताचे फलक झळकत होते. वारकर्‍यांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी पक्ष, संस्था, संघटना, मंडळांनी स्टॉल्स उभारले होते. सायंकाळी दोन्ही पालख्या शहरात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांचे अपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंडी गर्दी केली. तुकोबा आणि माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहर्‍यावर अनोखा आनंद दिसत होता.