Mon, Sep 24, 2018 21:11



होमपेज › Pune › आयाराम ‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केले : संजय राऊत

आयाराम ‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केले : संजय राऊत

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 12:06AM



पिंपरी : प्रतिनिधी

भाजप हा राष्ट्रीय संघ परिवारातून निर्माण झालेला  पक्ष आहे. आतापर्यंत त्यानुसारच पक्षाची वाटचाल सुरू होती; परंतु आता तो मूळ भाजप राहिला नाही. सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेऊन ‘वाल्याचा वाल्मिकी’ करण्याचे धोरण स्वीकारले गेले. या ‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केल्याची टीका, शिवसेना नेते आणि पुणे विभागीय संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.  महिलांचा अवमान करणार्‍या भाजपचे आमदार राम कदम यांना विधिमंडळात प्रवेशबंदी केली पाहिजे. त्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकार्‍यांची गुरुवारी (दि. 6) बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, राज्य संघटक  गोविंद घोळवे, मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. 

खा. राऊत म्हणाले की, सत्तेसाठी भाजपने दुसर्‍या पक्षातील लोकांचा भरणा केला. हे आयाराम ‘वाचाळगिरी’ करत आहेत.  पंढरपूरचे भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेले आक्षेपार्ह विधान जनता अजूनही विसरली नाही. अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले वक्तव्य आणि आता भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी केलेले वादग्रस्त विधान हे सर्व पाहिल्यावर हा अटलजींचा भाजप आहे काय, असा प्रश्न पडत आहे. राम कदम यांनी सर्व भगिनींचा अवमान केला आहे. कायदा करणारेच अशी बाष्कळ बडबड करत असतील तर, राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचे. त्यामुळे केवळ माफी मागून हा प्रश्न मिटणारा नाही. कदम यांचे निलंबन करण्यात यावे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळापेक्षा जास्त भ्रष्टाचार भाजपच्या राजवटीत सुरू आहे. ठेकेदारांच्या पैशांवर निवडणुका जिंकल्या जात आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा शिवसेनेने नारा दिला आहे. आम्हीदेखील तयारी सुरू केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

‘आम्हीही साम, दाम, दंड, भेद राजनीती करू शकतो’

शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत यांना भाजपने आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद दिले. अराफत यांनी दुसर्‍या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्पष्ट झाले.  या फोडाफोडीस शिवसेना उत्तर देणार का, असे विचारले असता आम्हीही साम, दाम, दंड, भेद ही राजनीती करू शकतो, असे खा. राऊत म्हणाले.