होमपेज › Pune › चंदनाला वास चोरीचा...

चंदनाला वास चोरीचा...

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:30AMपुणे : अक्षय फाटक

चंदनाचे झाड म्हणजे सुगंध अन् त्याचे बाजारात असणारे लाखो रुपयांचे मूल्य. पण, याच चंदनाला आता चोरीचा वास लागला आहे. चंदनाच्या झाडांची कत्तल करून या सुगंधाची चोरटे बिनदिक्क्कत चोरी अन् विक्री करीत आहेत. या प्रकाराचे ना पोलिसांना गांभीर्य आहे, ना तक्रारदारांना फिकीर. कारण, या चंदनचोरांनी चोरीसाठी निवडलेल्या जागा या शासकीय कार्यालयांचे आवार, शाळा-महाविद्यालयांची अन् टेकड्यांची आहेत. विशेष म्हणजे ही सर्व सुरक्षित स्थळे समजली जातात.

पुणेकर तसे झाडांचा मुलासारखा सांभाळ करतात. त्याची आवडीने निगा आणि देखभालही करतात. इतकेच काय तर, बेकायदेशीर झाड तोडण्यास विरोध करीत त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. अनेक पर्यावरणप्रेमी संस्थाही शहरात कार्यरत आहेत. पण, याच शहरात सध्या चंदन चोरट्यांची चलती आहे. 

शहरातील सुरक्षित समजली जाणारी ही ठिकाणेच हे चोरटे टार्गेेट करून चोर्‍या करीत आहेत, तरीही याबाबत कुठेही आरडाओरड किंवा निषेधाचा सूर लागताना दिसत नाही हे विशेष! 

दोन दिवसांपूर्वीच कोंढव्यातील एका शाळेतून आठ चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे आठ दिवसांनंतर पोलिसांकडे याची तक्रार देण्यात आली. तर, त्यापूर्वी ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या पथकाने साडेतीनशे किलो चंदन घेऊन जाणार्‍यास यवतजवळ पकडले. शहरातून दोन वषार्र्ंत चाळीस झाडांची चोरट्यांनी कत्तल करून चोरी केली आहे. मात्र, केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील; इतकेच गुन्हे पोलिसांना उघडकीस करण्यात यश आले आहे. पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. शहरात घरफोड्या, सोनसाखळी, लुटमारी आणि वाहन चोरीच्या घटनांसोबत या चंदन तस्करांच्या टोळ्यांना आवर घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. 

चंदनाची तस्करी यासाठी...

या चंदनांच्या झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत; तसेच त्याचा उपयोग सुगंधी द्रव्ये, सौैंदर्य प्रसाधने निर्मितीसाठी वापर होतो. विशेषकरून चंदनाच्या तेलाचा ‘बॉडी स्प्रे’मध्ये वापर केला जातो. इतकेच नाही तर चंदनाच्या लाकडाच्या भुशाचा उदबत्ती बनविण्यासाठी वापर होतो. 

चंदनाचे ‘डिलर’ सोलापूर अन् नगरमध्ये... 

पुणे शहर आणि जिल्ह्यातून चोरण्यात येणार्‍या चंदनाच्या तस्करीचे जाळे सोलापूर आणि नगरपर्यंत असल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन सख्ये भाऊ सर्वात मोठे चंदन तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी चंदनचोरांकडून ही झाडे घेण्यासाठी गावोगावी एजंट नेमले आहेत. हे एजंट पुणे शहर व ग्रामीण भागातून चोरट्यांकडून दोन ते तीन हजार रुपये किलो दराने चंदन गोळा करतात. त्यानंतर सोलापूर व नगरमध्ये हेच चंदन सात हजार रुपये किलोच्या दराने विक्री करतात, अशी माहिती समोर आली आहे. 

ना पोलिसांना गांभीर्य; ना तक्रारदारांना फिकीर

पुणे शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होत आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला जाण्याच्या मोठ्या घटना आहेत. त्यामुळे याची तक्रार देण्याबाबत उदासीनता असते. अनेक घटनांची तर, तक्रारही येत नाही. कोेंढव्यात आठ दिवसांनी चंदनाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार दिली गेली. त्यामुळे पोलिसही याकडे तितक्या गांभीर्याने पाहात नाहीत. चंदन तस्कर हीच संधी साधतात. दिवसा फिरून पाहणी केल्यानंतर त्याच रात्री ही झाडे कटरच्या माध्यमातून चोरली जातात.