Wed, Jun 26, 2019 12:10होमपेज › Pune › संमेलनाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय उद्या

संमेलनाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय उद्या

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:34AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महाराजा सायाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदे नगरीत आगामी 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
यंदाच्या संमेलनाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार आणि कोण होणार यंदाचा संमेलनाध्यक्ष, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. 

याचा अंतिम निर्णय उद्या म्हणजे रविवार, दिनांक 10 रोजी दुपारपर्यंत लागणार आहे. शनिवारी (दि. 9) सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पोहोचतील. त्यानंतर दुसर्‍या दिवशी निकाल दिला जाईल.

गेल्या काही वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदावर मराठवाड्याचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाचे संमेलनाध्यक्षपद नागपूरकडे की पुण्याकडे, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. संमेलनाध्यक्षपदाचा निकाल जरी गुलदस्तात असला तरी साहित्य वर्तुळात संमेलनाध्यक्ष कोण होणार, कामाने कोण मोठा आणि पैशाने कोण मोठा, यांसारख्या चर्चांना उधाण आले आहे. आयोजक संस्थेची मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार संमेलनाध्यक्षपदाचा दावेदार ठरतो, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र या मतपत्रिका एकगठ्ठा पद्धतीने न आल्याने ऐन वेळी ‘गेम चेंजर’ कोण ठरणार, हे पाहणे औैत्सुक्याचे ठरेल.

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी एकूण 1070 मतदार मतदान करणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेने सुरुवातीपासूनच लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

पुण्यातील पुरोगामी संघटना, कार्यकर्त्यांनी राजन खान यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या पाठिंब्यामुळे रवींद्र शोभणे यांचे पारडे जड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद देशमुख यांच्यासाठी छुप्या पद्धतीने खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सत्य काय हे गूढच आहे.