Tue, Jul 23, 2019 04:14होमपेज › Pune › हजारो शंभुभक्‍तांचा वढू बुद्रुकला जागर

हजारो शंभुभक्‍तांचा वढू बुद्रुकला जागर

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:16AMकोरेगाव भीमा : प्रतिनिधी

हजारोंच्या संख्येने जमलेले शंभुभक्‍त...छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष....तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर होणारी पुष्पवृष्टी यामुळे वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ दुमदुमून गेले होते. औचित्य होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिनाचे. वढू बुद्रुक, संभाजीनगर (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 329 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना हजारोंच्या संख्येने आलेल्या शंभुभक्‍तांनी मानवंदना दिली. 

या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, दिनेश डोके, बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.  संदीप पखाले, जि.प. सदस्या सविता बगाटे, पं. स. सदस्या सविता पर्‍हाड, वढूचे सरपंच, उपसरपंच, आजी- माजी सदस्य या वेळी उपस्थित होते.

सौरभ राव, सुवेझ हक, आमदार बाबूराव पाचर्णे; तसेच गावातील प्रमुखांच्या हस्ते समाधीस्थळावर सर्वप्रथम शासकीय महापूजा करण्यात आली. तसेच या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या वेळी ‘जय भवानी - जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.  

याप्रसंगी 29 डिसेंबर 2017  व 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वढू बुद्रुक येथे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या पोलिस चौकीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 6 वाजता मागील 40 दिवसांपासून शंभू महाराज यांच्या स्मरणार्थ करण्यात येणार्‍या बलिदान मासाची सांगता आज करण्यात आली. या वेळी वढू बुद्रुक ग्रामस्थ व शंभुभक्त यांच्या वतीने संपूर्ण गावातून मूक पदयात्रा काढण्यात आली. या संपूर्ण पदयात्रेचे नियोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. आ. पाचर्णे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस, लोणीकंद पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी समाधीस्थळाकडे जाणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती. गावातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. गावापासून काही अंतरावर माहेर संस्थेजवळ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती; त्यामुळे अनेकांना पायी चालतच समाधीस्थळावर यावे लागत होते.

 

Tags : Pune, Pune News, Vadhu Budruk, Sambhaji Maharaj death anniversary,