Fri, Apr 26, 2019 17:24होमपेज › Pune › भिडेंच्या अटकेसाठी रिपाइंचा मोर्चा

भिडेंच्या अटकेसाठी रिपाइंचा मोर्चा

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी, संभाजी भिडेंना अटक करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करू नये, तसेच कठुआ, उन्नाव बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.  

केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेला हा मोर्चा पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर निदर्शने करण्यात आली. या वेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, हनुमंत साठे, महेश शिंदे, चंद्रकांता सोनकांबळे, सुधाकर शिरसाट, महिपाल वाघमारे, शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.  

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपींना अटक करावी; तसेच कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा प्रकरणात हात असेल, तर त्यांनाही अटक करावी; तसेच कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार असलेल्या पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून, तिच्या मारेकर्‍यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्र बंदमधील आंदोलकांवरील खटले मागे घ्यावेत. त्याचप्रमाणे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता या कायद्याचे संपूर्ण संरक्षण व्हावे व मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीमधील  आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संसदेत कायदा करावा, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी व भटक्या विमुक्‍तांच्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचे निवेदन या वेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.