Mon, Aug 19, 2019 11:10होमपेज › Pune › आंतरिक ऐक्याशिवाय एकता अशक्य 

आंतरिक ऐक्याशिवाय एकता अशक्य 

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

खोट्याला खोट्याने उत्तर दिले, तर आपली संस्कृती अधिक उज्ज्वल होत नाही, असे सांगत समाजात आंतरिक ऐक्य राहिले नाही, तर देश एक होणार नाही, असे प्रतिपादन प्राच्य विद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

पुण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डॉ. साळुंखे यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद  पवार, माजी मंत्री भाई वैद्य, उमाकांत दांगट, शिवाजी जोंधळे, प्रदीप शिर्के, कमलजी महाले, सविता मनोहर, मधुकर कोकाटे, संजय कल्याण आदी उपस्थित होते. या समारंभप्रसंगी अमृतमहोत्सवी गौरव करताना साळुंखे यांची ग्रंथतुला करण्यात आली. पवार यांच्या हस्ते तुकाराम पगडी आणि मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी साळुंखे यांच्या जीवनावरील माहितीपट दाखविण्यात आला.

आपल्या भाषणात त्यांनी, चार्वाकामुळे वैचारिक लेखनाकडे वळल्याचे आवर्जून सांगितले. जीवनात येणार्‍या सुख, दुःखाला जो काडीचेही महत्त्व देत नाही तो यशस्वी होतो, या गौतम बुद्धांच्या वचनाची आठवण त्यांनी जागवली. स्त्रीभ्रूणहत्या अत्यंत भीषण दुष्टचक्र असून, ते समाजाला महागात पडणार असल्याचे भविष्य त्यांनी वर्तवले. चांगला कार्यकर्ता होण्यासाठी चांगला माणूस होणे ही पूर्वअट असली पाहिजे, असेही ते म्हणाले. पुणे शहरातून देशातल्या विषमतेच्या महापुरापुढे भक्कमपणे उभे राहण्याचे काम आधुनिक काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा पुण्यात सत्कार होतो आहे, याचा खूप आनंद होतो आहे, अशी भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. या प्रसंगी आई, वडील, कष्टकरी भावंडांची, त्यातही बंधू पांडुरंग, निळू फुले, नागनाथअण्णा नायकवडी, माझे शिक्षक, चाहते, टीकाकारांची आठवण होत असून, त्यांना मी धन्यवाद देतो, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

पवार यांनी बोलताना साळुंखे यांचा शब्दगौरव केला. त्यांच्या संपूर्ण कार्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. धर्मशास्त्रासारख्या विषयावर त्यांनी 100हून अधिक लेख लिहून आपली उंची दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले. संत तुकारामांच्या माध्यमातून त्यांनी विद्रोही समाजाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी वैदिक परंपरेला विरोध, बहुजनांची मानसिक गुलामगिरीतून मुक्तता केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी डॉ. साळुंखे यांची स्तुती केली. साळुंखे यांनी पत्नीसाठी लिहिलेल्या पुस्तकातील परिच्छेद त्यांनी आपल्या भाषणाअंती वाचला.  
माजी मंत्री भाई वैद्य यांनी सरकारच्या विचारप्रक्रियेवर ताशेरे ओढले. या काळात विज्ञान सोडून धर्म ग्रंथांना महत्त्व दिले जाते, असे सांगत वेदांना गौतम बुद्ध, महावीर, चार्वाकांनी नाकारले, पण आता 21व्या शतकात त्यांचा आदर्श मानणारी मंडळी निर्माण झाली, अशी खंत व्यक्त केली. आता जातीयता अजून दृढ होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. गोळवलकर, दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या ग्रंथांमध्ये मनुस्मृतीची भलावण केली आहे, अशा परिस्थितीत स्त्री-पुरुष विषमतेवर साळुंखे तुटून पडतात, याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. 

शिव महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी त्यांनी बहुजनांचे मन, मेंदू आणि मस्तक तल्लख राहावे म्हणून ज्यांनी अनेक ग्रंथ निर्माण करून देशविदेशात नाव कमावले अशा साळुंखे यांचा सत्कार करताना उपकृत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.