Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Pune › गरिबांच्या भाजीचे ‘मीठ अळणीच’

गरिबांच्या भाजीचे ‘मीठ अळणीच’

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:23PMपुणे : प्रतिनिधी 

रेशन धान्य दुकानातून गरिबांना धान्याबरोबरच लोह आणि आयोडीनयुक्त मीठही वितरत करण्यात येणार होते. मात्र, शासनाने आदेश देऊनही पुरवठा विभागाने अंमलबजावणीला वळसा घातला आहे. त्यामुळे गरिबांच्या भाज्यातील अळणीपणा कायम आहे. घोषणा होऊन आठवड्याचा कालावधी उलटूनही स्वस्त धान्य दुकानात आयोडीनयुक्त मीठाचा पुरवठाच करण्यात आला नाही. त्यामुळे घोषणा 
करणार्‍या शासनाच्या आदेशाला नेमकी आडकाठी कोणी घातली असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुणे आणि नागपूर शहरामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शहर पुरवठा विभागाने मीठाची मागणीच केली नाही. गरोदर असताना व स्तनपान देणार्‍या मातेला आयोडीनची विशेष गरज असते. ज्या गरोदर महिलेमध्ये आयोडीनची कमतरता असते, ती महिला मानसिक, शारीरिक व्यंग असलेल्या बालकास जन्म देण्याची शक्यता असते. प्रौढ व्यक्तीस दररोज सरासरी 150 मायक्रोग्रॅम व गरोदर तसेच स्तनपान देणार्‍या महिलेस दररोज सरासरी 200 मायक्रोग्रॅम एवढी आयोडीनची आवश्यकता असते. त्यामुळे आयोडीनयुक्त मीठाचा वापर वाढावा यासाठी राज्य शासानाने रेशन दुकानातून लोह आणि आयोडीनयुक्त मीठ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले.

लोह आणि आयोडीनयुक्त मीठ 14 रुपये प्रतिकिलो या दराने दिले जाणार आहे. खुल्या बाजारामध्ये मीठाचा 19 रुपये किलो असा दर असून, या मीठाचा पुरवठा टाटा ट्रस्ट करणार आहे. शिधापत्रिकाधारकांना उत्तम गुणवत्तापूर्ण मीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा ट्रस्टची असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. येत्या 1 जुलैपासून याची अंंमलबजावणी केली जाणार असल्याचे राज्याच्या पुरवठा विभागाने आदेशामध्ये सांगितले आहे. मात्र, 9 जुलैपर्यंत पुणे शहर पुरवठा विभागाकडे अद्यापही मीठ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे नगरिकांचे लक्ष लागले आहे.

मीठ का वितरीत केले जात आहे ?

राज्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण अधिक असून, चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, राज्यातील 6 महिने ते 5 वर्ष या गटातील 53.8 टक्के मुलांमध्ये तर 15 ते 49 या वयाच्या महिलांमध्ये 48 टक्के इतक्या प्रमाणात अ‍ॅनिमिया असल्याचे पहाणीतून समोर आले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकड़ून लोहयुक्त गोळ्यांचे वाटप केले जात असून, त्याच्या जोडीला आता आयोडीनयुक्त मीठ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.