Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Pune › तीन वर्षांचा सव्वातीन कोटींचा विक्रीकर बुडवला

तीन वर्षांचा सव्वातीन कोटींचा विक्रीकर बुडवला

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

व्यावसायिक महिलेने तीन वर्षांमध्ये तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचा विक्रीकर बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2006 ते 2009 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रवींद्र रावसाहेब पाटील (वय 33, रा. धानोरी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनघा प्रमोद घवलकर या महिलेवर भादंवि 409, 420 सह महाराष्ट्र मुल्यवर्धित कायदा 2002 चे क. 74 (1)(अ) व 74 (1)(ब) व 74 (2)(4)(5) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र पाटील हे राज्यकर निरीक्षक आहेत. तर, यातील महिलेचा मे. जेडी एंटरप्रायझेस नावाने लोखंडी व इतर धातुंच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय होता. त्या हा व्यवसाय 1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2008 या कालावधीत करत होत्या. त्यांच्याकडे या कालावधीत एकूण 3 कोटी 30 लाख 60 हजार 898 रुपयांची विक्रीकराची थकबाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे विक्रीकर शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.

दरम्यान, कार्यालयाकडून महिलेकडे संपर्क करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले गेले. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर या महिलेचे बँक खात्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या खात्यावर काहीच पैसे नसल्याचे आढळून आले. तर, त्यांच्या नावावर मालमत्ताही नसल्याचे समोर आले. त्यानुसार, महिलेने जाणीवपूर्वक विक्रीकर बुडविण्याच्या उद्देशाने कराचा शासकीय तिजोरीत भरणा केला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.