Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Pune › तब्बल १८ हजार टन मधाची वर्षभरात विक्री

तब्बल १८ हजार टन मधाची वर्षभरात विक्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यासह परराज्यात मधासाठी आवश्यक असलेल्या पिकांच्या फुलोर्‍यांमध्ये वाढ झाल्याने पुणे शहरातील मधामाशापालन केंद्रात मधाची आवक वाढली आहे. गेल्या वर्षी 3 राज्यांमधून केंद्रात 18 हजार 112 टन मधाची आवक झाली. त्याद्वारे मधविक्रीतून केंद्रात 41 लाख 15 हजारांची उलाढाल झाली असल्याची माहिती केंद्राचे उपनिदेशक डॉ. आर. के. सिंह यांनी दिली. 

शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशापालन केंद्रातील विक्री विभागामार्फत 2016-17 या आर्थिक वर्षात 1 किलो स्वरुपात 6 हजार 559 किलो, अर्धा किलोच्या 7 हजार 533, 250 ग्रॅमच्या 1 हजार 109 आणि 200 गॅ्रमच्या 3 हजार 294 बाटल्यांची विक्री झाली. त्याद्वारे केंद्राला सुमारे 41 लाख 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. केंद्रात मधाची आवक ही देशातील तामिळनाडूतील राजापायम, मध्यप्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील जोहरा तर महाराष्ट्रातून वर्धा जिल्ह्यातील फूलगाव येथून होते.

मध्यप्रदेशात फुलोर्‍याचा काळ सर्वाधिक 9 महिने राहात असल्याने याठिकाणी बी फार्मिंग तसेच पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, मधासाठी आवश्यक पराग आणि मकरंद मध्यप्रदेशात उत्पादित होणार्‍या सूर्यफूल, मोहरी आणि बरसिम आदी वनस्पतींच्या फुलांमध्ये सर्वात जास्त असते. परिणामी, याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन मध उत्पादनास चालना मिळते. 

गेल्यावर्षी मध्यप्रदेशातील जोहरा येथून 6 हजार 845 किलो तर मोरेना येथून 10 हजार 246 किलो, तामिळनाडूतील राजापायम येथून 6 हजार 250 तर महाराष्ट्रातील मेळघाट येथून 2 हजार 185 किलो मध केंद्रात दाखल झाला होता. शेतकर्‍यांकडून मध खरेदी करताना स्पेशल, ए तसेच स्टॅण्डर्ड ग्रेड या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येते.  सूर्यफूलापासून मिळालेला मध सर्वाधिक गोड तर जांभळाचा मध हा कमी गोड असतो.