Tue, Mar 26, 2019 20:19होमपेज › Pune › भांगयुक्‍त मनुक्याचे व्यसनी वाढले

भांगयुक्‍त मनुक्याचे व्यसनी वाढले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

फुरसुंगी परिसरातील गणपती मंदिराजवळ तीन पान टपर्‍यांच्या दुकानांमधून कायद्याने बंदी असलेल्या भांगयुक्‍त नशा होणार्‍या गोळ्यांची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे परिसरातील मुलांसह कामगारांना त्याचे व्यसन लागले आहे. यामुळे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी एफडीए तसेच पोलिसांनी या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात फुरसुंगी परिसरातील कामगारांना अचानक रक्‍तदाब वाढणे, गुंगी येणे, घाबरल्यासरखे होणे ही लक्षणे दिसून आली. नागरिकांना त्यांना तेथील स्थानिक डॉक्टरांना दाखविल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच डॉक्टरांनी या गोळ्यांमध्ये भांगाची मात्रा असून त्या खाल्यामुळे रक्‍तदाब वाढणे, गुंगी येणे, किडनीवरही त्याचा परिणाम होेतो असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांना या गोळ्या न खाण्याचा सल्‍ला दिला आहे.  या ठिकाणी तपासणी करण्यात येईल आणि संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले. दरम्यान, भांगयुक्त पदार्थ विकणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

मध्यप्रदेशमधून कुरिअरने येतात गोळ्या

पाकिटावर ‘मस्ताना मनुका’ असा उल्‍लेख असलेल्या गोळ्या या मध्यप्रदेशातून कुरियरने या परप्रांतीय दुकानदारांकडे येत आहेत. तर मुलांना आणि नागरिकांना दहा रुपयांना ही गोळी देण्यात येत आहे. फुरसुंगीच्या गणेश मंदिराजवळील टपर्‍यांवर ही विक्री होत आहे. त्यांना काही स्थानिकांचा पाठिंबा असल्याने त्यांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.


  •