होमपेज › Pune › एमफील, पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना वेतन

एमफील, पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना वेतन

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एम.फील.- पी.एचडी. करणार्‍या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. एम.फील. - पी.एचडी.च्या विद्यार्थ्यांनी पूर्वीप्रमाणेच विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाद्वारे घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनापासून वंचित असणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

विद्यापीठाद्वारे एप्रिल महिन्यापासून एमफील - पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करण्यात आले. विद्यापीठातील संशोधक पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार, तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा 5 हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने निधी नसल्याचे कारण देत एप्रिल महिन्यापासून विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले होेते. याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत विद्यावेतन सुरु करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. मात्र, विद्यापीठ प्रशासन कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांचे संशोधन थांबले होते. संशोधन करताना विद्यार्थ्यांना आर्थिक खर्चासाठी विद्यावेतन मिळणे गरजेचे असून विद्यावेतनाअभावी विद्यार्थ्यांना आर्थिक तरतुदीसाठी इतरत्र काम करण्याची वेळ आली असल्याची तक्रार विद्यार्थींनी केली होती. 

या अटींची करावी लागणार पूर्तता

विद्यापीठाद्वारे विद्यावेतन घेणार्‍या एमफील - पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दरसहा महिन्याला संशोधन प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले संशोधन प्रगती अहवाल विद्या शाखा निहाय स्थापन करण्यात आलेल्या समितीपुढे ठेवण्यात येणार आहेत. तसेच दर सहा महिन्याला आयोजित सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना केलेल्या कामाचे सादरीकरण करणे बंधनकारक केले आहे.