Sun, May 19, 2019 14:34
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मुलीचा पाठलाग करणार्‍यास सक्तमजुरी

मुलीचा पाठलाग करणार्‍यास सक्तमजुरी

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMपुणे : प्रतिनिधी

शाळेतून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास एक वर्ष सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या कोर्टाने दिली. 

शंकर शेटेप्पा पोटे (वय 23, रा. केशवनगर, वनराई कॉलनी, धनकवडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. 20 नोव्हेंबर 2014 रोजी हा प्रकार घडला होता. फिर्यादी दुपारी सव्वाएक वाजता शाळा सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत घरी जात होत्या. त्या शिवाजी रोडने पायी स्वारगेटला जाताना पोटे दुचाकीवरून आला.

फिर्यादींच्या समोर उभा राहिला व त्यांना आवाज दिला. फिर्यादी यांनी त्यास कोणताही प्रतिसाद न देता पुढे निघाल्या. त्यावेळी पोटेने फिर्यादी यांच्याशी बोलण्याचा प्ऱयत्न करत त्यांचा पाठलाग केला. आरोपीच्या या वागण्यामुळे फिर्यादी व त्यांची मैत्रीण थेट खडक पोलिस स्थानकात गेल्या होत्या. फिर्यादी पोलिसांत गेल्याचे पाहिल्यानंतर पोटे याने तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी 4 साक्षीदार तपासले. त्यातील मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलिस उपनिरीक्षक बी. आय. जानकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. दंड न भरल्यास शिक्षेत एक महिना वाढ करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.