होमपेज › Pune › विद्यापीठाद्वारे साईबाबा अध्यासनाला अद्याप मंजुरी नाही

विद्यापीठाद्वारे साईबाबा अध्यासनाला अद्याप मंजुरी नाही

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:52PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याद्वारे श्री साईबाबा अध्यासन सुरू करण्याबाबतचे विचारणा करणारे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्याला उत्तर म्हणून विद्यापीठाने त्याच्या खर्चासाठी लागणार्‍या रकमेबाबत माहिती संस्थानाला कळविण्यात आली होती. दरम्यान, अद्याप विद्यापीठाद्वारे श्री साईबाबा अध्यासनाला कोणतीही मंजूरी देण्यात आलेली नसल्याचे विद्यापीठ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.  

श्री साईबाबा यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यास विद्यापीठाने मंजुरी दिल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यानंतर जनता दल युनायटेडच्या कुलदिप आंबेकर यांनी साईबाबा अध्यासन केंद्राची मंजुरी रद्द करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यावर विद्यापीठाने मंगळवारी स्पष्टीकरण दिले, कोणतेही अध्यासन सुरू करायचे असल्यास त्याची विशिष्ट प्रक्रिया आणि पद्धतीचा अवलंब करावा लागतो. सदर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतही अध्यासन सुरू करता येत नाही. त्यामुळे श्री साईबाबा यांच्या नावाने अध्यासनाला विद्यापीठाकडून कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच असे अध्यासन सुरू करण्याबाबतची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही, असे त्यात म्हटले आहे.

विद्यापीठाद्वारे श्री साईबाबा अध्यासन सुरू करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून विद्यापीठाने त्याच्या खर्चासाठी लागणार्‍या रकमेबाबत माहिती देणारे पत्र संस्थानला गेल्या महिन्यात पाठवले होते. अध्यासन सुरु करण्यासाठी ही रक्कम उपलब्ध करून देणे ही प्राथमिक अट आहे. मात्र, त्यानंतरही दीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागत असून कुलगुरुंच्या मान्यतेनंतर तसा प्रस्ताव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवावा लागतो. 

त्यानंतरच अध्यासन अस्तित्वात येते, मात्र, श्री साईबाबा अध्यासनाबाबत अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नसून या अध्यासनाला मान्यता दिली असण्याचा प्रश्‍नच उदभवत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.