Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Pune › ‘सहारा’च्या बेसहारा कर्मचार्‍यांसाठी एकवटली ६७ गावे

‘सहारा’च्या बेसहारा कर्मचार्‍यांसाठी एकवटली ६७ गावे

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 11 2018 11:06PMलोणावळा : वार्ताहर  

सहारा अँबी व्हॅली प्रकल्प बंद पडल्याने बेकारीची कुर्‍हाड कोसळलेल्या कर्मचार्‍यांसाठी लोणावळा शहरासह सहारा प्रकल्पाच्या परिसरातील 16 ग्रामपंचायती आणि त्यातील 67 गाव एकवटली असून, या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे राज्य सरकार सोबतच सर्व कायदेशीर बाबींची माहिती घेऊन त्यानुसार न्यायालयामध्ये दाद मागण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदू वाळुंज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुळशीचे माजी आमदार शरद ढमाले, माजी जि.प.सदस्य आनंद आखाडे, माजी पं.स. सभापती कोमल वाशिवले यांच्यासह 16 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. सहारा अँबी व्हॅली प्रकल्प बंद पडल्याने या ठिकाणी नोकरीस असलेल्या या 67 गावांमधील तसेच लोणावळ्यातील हजारो कर्मचार्‍यांच्या कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कर्मचार्‍यांच्या तसेच सहारा परिसरातील गावातील मुलांसाठी सहाराने सुरू केलेली आणि या भागातील एकमेव असलेली माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तर ज्या कर्मचार्‍यांची मुले बाहेर लोणावळ्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे अशा कर्मचार्‍यांकडे पैसे नसल्याने अशा सुमारे अडीच हजार मुलांच्या शालेय फी चा आणि अनुषंगाने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सहारामध्ये उच्च पदावर काम केलेले असतानाही बेकार होऊन घरी बसावे लागल्याने येथील अनेक कर्मचार्‍यांनी मिळेल ती आणि मिळेल त्या पगारात कोणतीही नोकरी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. पण आद्यपही अजून नोकरी न मिळालेल्या अनेकांच्या घरात दोन वेळची चुलही पेटत नाही अशी वस्तुस्थिती आहे. आशा परिस्थितीत जगणार्‍या या कर्मचार्‍यांना न्याय मिळावा यासाठी एकत्रित काहीतरी निर्णय घेण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य सरकारने स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सहारामुळे बेसहारा झालेल्या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा, त्यांना न्याय मिळवून द्यावा असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष पुजारी यांनी केले. तर सहारा प्रकल्प बंद पडण्याचा फटका लोणावळा शहराच्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणात बसलेला असून अनेकांचे संसार रस्त्यावर येण्याच्या मार्गावर असल्याने आता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन करीत नगरध्यक्षा सुरेखा जाधव यांनी नागरपरिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य यासाठी आवश्यक आहे ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर इतर सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आपापल्या ग्रामसभेत याबाबत ठराव करून या ठरावाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे साकडे घालण्याबाबत निर्णय घेतला; तसेच मा.न्यायालयापुढेही या कर्मचार्‍यांची बाजू मांडण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.