Mon, May 20, 2019 08:13होमपेज › Pune › गणेश तलावाची सुरक्षा ‘रामभरोसे’

गणेश तलावाची सुरक्षा ‘रामभरोसे’

Published On: Jan 28 2018 1:38AM | Last Updated: Jan 27 2018 11:28PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरण स. नं. 26 मधील गणेश तलाव वीर सावरकर उद्यानात पर्यटकांची संख्या वाढत आहे; मात्र दुसरीकडे भुरट्या चोर्‍यांमुळे पर्यटक व त्यांच्या वाहनांची सुरक्षा ‘राम भरोसे’ आहे. सुरक्षेसाठी तलावाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

प्राधिकरणातील गणेश तलाव पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. येथे वीर सावरकर उद्यान, बॅडमिंटन हॉल यामुळे वर्दळ वाढली आहे. अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन; तसेच दिवाळी पाडव्याला दीपोत्सव यांसारखे कार्यक्रम येथे होतात. दररोज लोक मॉर्निंग वॉक, बॅडमिंटन खेळण्यासाठी येतात; मात्र उद्यानाची सुरक्षा ‘राम भरोसे’ आहे. येथे भुरट्या चोर्‍या वाढल्या आहेत. दुचाकीस्वारांनी गाड्या पार्क केल्यानंतर डिकी खोलून, डिकीतील वस्तू लांबविण्याच्या घटना घडत आहेत; मात्र तक्रार नोंदविण्यासाठी देहूरोड पोलिसांकडे जावे लागत असल्याने पर्यटकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. तक्रार नोंदवायला ते आळस करतात, यामुळे भुरट्या चोरांचे फावले आहे. महापालिकेने उद्यान व तलावाच्या ठिकाणी सक्षम सुरक्षारक्षक  तैनात करावेत; तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

उद्यानाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ यांना विचारले असता ते म्हणाले की, याआधी अशा घटना घडत नव्हत्या. सुरक्षा व्यवस्था बदलल्याने कदाचित असे प्रकार वाढले असावेत. मी भराडी देवीच्या यात्रेसाठी गावी आलो आहे. पिंपरी-चिंचवडला परतल्यानंतर उपाययोजनांबाबत निश्‍चित पावले टाकू.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांना विचारले असता ते म्हणाले की, गणेश तलाव, सावरकर उद्यान, बॅडमिंटन हॉल आणि पार्किंग असे बरेच काही येथे आहे. उद्यानात सुरक्षारक्षक आहेत; मात्र पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. ज्या काही भुरट्या चोर्‍या होत असतील त्या पार्किंगमध्ये होत असाव्यात, तरीही उद्यानात मोठी गर्दी असते हे लक्षात घेऊन या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महापालिकेचे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याकडे करण्यात आली आहे, असे साळुंके यांनी सांगितले.