होमपेज › Pune › पिंपरी : पन्नास कोटींची उलाढाल होणार ठप्प

सेफ्टी क्रॅशगार्डची ५० कोटींची उलाढाल होणार ठप्प

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:06AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

राज्यभरात सेफ्टी कॅ्रशगार्ड निर्माण करणार्‍या लहान व मोठ्या सुमारे 25 कंपन्या आहेत. सेफ्टी क्रॅशगार्डवर शासनाने अध्यादेश काढून कारवाईचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा फटका म्हणून कंपन्यांवर संक्रांत येणार आहे. त्यामुळे शहरातून वर्षाकाठी होणारी सुमारे 50 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे, तर एक हजार कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. महिन्याकाठी कर स्वरूपात मिळणार्‍या 75 लाखांच्या रकमेपासूनही शासनाला मुकावे लागणार आहे.  

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने वाहनांना बसवलेले क्रॅशगार्ड्स असुरक्षित असल्याचे परिपत्रक काढून सर्व राज्यांना कळविण्यात आले आहे. भारतीय वाहन कायद्यात चारचाकी  वाहनांना  सेफ्टी क्रॅशगार्ड लावण्यासंदर्भात  कोणताही कायदा नाही, तरी देखील ‘आरटीओ’ विभागाकडून वाहनांचे क्रॅशगार्ड काढण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याचा आरोप संबंधित कंपन्या करत आहेत. ही बेकायदेशीर कारवाई असून, ती त्वरित थांबविण्यात यावी. या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली असून, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कारवाई थांबविण्याची मागणी इंडियन सेफ्टी गार्ड्स इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने केली आहे.

गार्ड्सचे उत्पादन करणार्‍या महाराष्ट्रात सुमारे 30 कंपन्या आहेत, तर पिंपरी-चिंचवड शहरात असे उत्पादन करणारी एक कंपनी आहे. सेफ्टी कॅ्रशगार्डची निर्मिती करणार्‍या या कंपनीची वर्षाकाठी 50 कोटींची उलाढाल आहे. कंपनीत प्रत्यक्ष 350 कामगार कार्यरत आहेत, तर अप्रत्यक्षपणे सुमारे 700 कामगार अवलंबून आहेत. या कंपनीअंतर्गत तीन ठेकेदारांचा समावेश असून, या प्रत्येकाकडे 30 कामगार कार्यरत आहेत. याबरोबरच व्हेंडर, वितरक, कस्टमर, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे आदींची एकूण संख्या सुमारे एक हजार आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका कंपनीसह कामगारांना बसणार आहे. शहरातून ‘जीएसटी’ स्वरूपात शासनाला महिन्याकाठी 75 लाख रुपये मिळत आहेत. कंपनी बंद करण्याची वेळ आल्यास याचा मोठा फटका शासनालाही बसणार आहे.

पर्यायी बदल सुचवा

इंडियन रोड सेफ्टी जर्नलमध्ये सेफ्टी गार्ड्समुळे पादचार्‍यांना इजा झाल्याची एकही नोंद नाही. भारतात या गार्डमुळे अपघातादरम्यान एअरबॅग उघडते अथवा नाही याबाबतीत कोणतेही संशोधन झालेले नाही; मात्र परकीय संशोधकांच्या मते योग्यप्रकारे गार्ड्स बसविल्यास एअरबॅग योग्य प्रकारे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तरीदेखील ही दोन्ही कारणे सांगून उत्पादन पूर्ण बंद करण्यापेक्षा पर्यायी बदल सुचवा, आम्ही काम करू, अशी मागणी इंडियन सेफ्टी गार्ड्स इंडस्ट्रीज असोसिएशनद्वारे शासनाकडे केली आहे.