Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Pune › मिशन यंग अ‍ॅण्ड फिट इंडिया मोहिमेची सुरुवात

पुणे  विद्यापीठात उद्या सचिनची मुलाखत

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे ‘मिशन यंग अ‍ॅण्ड फिट इंडिया’ मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त उद्या (दि. 21) रोजी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता ‘आयुका’च्या चंद्रशेखर सभागृहात मुलाखत होणार आहे. प्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले मुलाखत घेणार आहेत. तरुण पिढीला क्रीडा प्रकारांमध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी क्रीडा व शारीरिक विभागाचे डॉ. दीपक माने उपस्थित होते.

डॉ. शाळीग्राम म्हणाले, भारतातील तरुण पिढी विविध कारणांमुळे मैदानाकडे फारशी वळत नाही. अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील एक तृतियांश तरुण मुले-मुली कोणताही खेळ खेळत नाहीत किंवा, व्यायामही करत नाहीत. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी ‘मिशन यंग अ‍ॅण्ड फिट इंडिया’ची सुरुवात केली जाणार आहे.  

विद्यापीठाच्या कृतीत विरोधाभास... 

एकीकडे विद्यापीठाद्वारे मुलांना खेळाकडे वळविण्यासाठी मिशन यंग अ‍ॅण्ड फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली जात आहे, तर दुसरीकडे विद्यापीठाच्या मैदानात गेले कित्येक महिने चित्रपटाच्या शूटिंगचा सेट तसाच पडून आहे. चित्रपटाचा सेट काढून घेण्याचे वारंवार आदेश देऊनही सेट न काढणार्‍या नागराज मंजुळे यांच्यावर कोणतीही कारवाई न करणार्‍या विद्यापीठाद्वारे क्रीडांगणाचे महत्त्व सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कृतीत विरोधाभास दिसून येत आहे. हा सेट त्वरित काढण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, उच्च शिक्षण संचालक धवराज माने यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मंजुळे यांना सेट काढण्याचे तीन आदेश दिले, तरीही सेट अर्धवट अवस्थेत तसाच आहे.