Thu, Jul 18, 2019 17:02होमपेज › Pune › एसटीच्या प्रतिष्ठित गाड्या होताहेत रद्द

एसटीच्या प्रतिष्ठित गाड्या होताहेत रद्द

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 11:37PMपुणे : निमिष गोखले 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अनेक प्रतिष्ठित गाड्या आयत्या वेळी रद्द करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या आरामदायी, वातानुकूलित शिवशाही व शिवनेरीच्या अनेक फेर्‍या गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना एकतर दुसरा पर्याय निवडावा लागतो किंवा एसटी महामंडळाने सोडलेल्या बदली गाडीने नाईलाजास्तव प्रवास करावा लागतो. 

बहुतांश वेळा रद्द करण्यात आलेल्या शिवशाही, शिवनेरी बसऐवजी सेमी लक्झरी श्रेणीतील विना वातानुकूलित हिरकणी प्रवाशांच्या माथी मारली जात असून इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्याकरिता प्रवाशांना त्यातूनच प्रवास करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वातानुकूलित बस रद्द केल्यानंतर साधी हिरकणी मार्गावर सोडण्यात येते. तिचा तिकीट दर पन्नास ते दीडशे रुपये कमी असताना प्रवाशांना तिकिटामधील फरकाची रक्कम वाहकाकडून परत मिळत नाही. अधिकचे पैसे मोजून गारेगार प्रवासाऐवजी घामाघूम होत प्रवास करावा लागत आहे. स्वारगेट-बोरिवली मार्गावरील शिवनेरी, महाबळेश्‍वर-पुणे स्टेशन मार्गावरील शिवशाही, स्वारगेट-सांगली मार्गावरील शिवशाही, स्वारगेट-ठाणे मार्गावरील शिवनेरीच्या बाबतीत हा प्रकार सातत्याने घडत असल्याचे उघडकीस आले आहे.  

दुपारच्या वेळी या मार्गावरील बस रद्द केल्याचे प्रमाण सर्वाधिक असून प्रवाशांना स्थानकावर आल्यावरच वातानुकूलित बस रद्द झाल्याची व बदली साधी बस पाठविण्यात आल्याची माहिती कळत असल्याचे दिसून येते. या प्रकाराबाबत अनेक प्रवासी आगारप्रमुखांना जाब विचारत असून तांत्रिक कारणामुळे बस रद्द करण्यात आल्याचे सरकारी उत्तर दरवेळी त्यांना मिळते. काही वेळेला तर हा आमच्या आगाराचा विषय नसून दुसर्‍या आगारातून बस वेळेत दाखल न झाल्याने बस रद्द करावी लागल्याचे अजब उत्तर मिळते. तर बहुतांश प्रवाशांना टोलवाटोलवीच्या उत्तराला देखील सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येते.  दरम्यान, एसटीचे आरक्षण करताना प्रवाशांचा मोबाईल नंबर लिहून घेण्यात येतो. बसची फेरी रद्द किंवा बदली बस पाठविण्यात येणार असेल, तर कमीत कमी एक तास आगोदर प्रवाशांना त्याबाबत संदेश पाठवून सूचित करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.