Tue, Mar 26, 2019 01:44होमपेज › Pune › एसटीचे तिकीट दहा टक्क्यांनी वाढणार

एसटीचे तिकीट दहा टक्क्यांनी वाढणार

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी 

वारंवार होत असलेल्या डिझेल दरवाढीचा झटका सहन न झालेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दहा टक्के तिकीट दरवाढीचे सूतोवाच केले आहे. यामुळे प्रवाशांना भाडेवाढीचा चांगलाच दणका बसणार आहे. जून महिन्यात तिकीट दरवाढीची अंमलबजावणी होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. यामुळे प्रवाशांना कमीत कमी 10 रुपये व जास्तीत जास्त 60 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणेकरांनादेखील एसटी तिकीट दरवाढीचा फटका बसणार असून, सर्वच मार्गांवरील तिकीट महागणार आहे.

पुणे विभागातून दररोज एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या सुमारे दहा ते बारा लाखांच्या घरात असून दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या दरात देखील 20 ते 30 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ही दरवाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, एसटीच्या तिकीट दराच्या पन्नास टक्क्यापर्यंतच दरवाढ केली जाऊ शकते, असा नियम असून, त्यापुढे खासगी बसगाड्यांना तिकीट वाढविता येणार नसल्याची माहिती देण्यात आली.