होमपेज › Pune › एसटी तिकीट 30 ते 127 रूपये महागणार

एसटी तिकीट 30 ते 127 रूपये महागणार

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) घेतलेल्या 18 टक्के तिकीट दरवाढीच्या निर्णयामुळे पुण्यातून ये-जा करणार्‍या प्रवाशांनादेखील मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पुणे विभागातून एक हजार बस दररोज धावत असून, दरवाढीमुळे दि. 15 जूनपासून प्रवाशांना किमान 30 रुपये ते कमाल 127 रुपये अधिकचे मोजावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सध्या एसटीला दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा डिझेल दरवाढीमुळे होत असून कर्मचारी वेतनवाढीमुळे वर्षाला सुमारे 450 कोटी रुपयांचा अतिरिक्त तोटा एसटी प्रशासनाला सोसावा लागणार असल्याचा दावा करत प्रशासनाने दरवाढ घोषित केली आहे. 

सध्या एसटीच्या राज्यात 19 हजार बस दररोज ये-जा करत असून त्यातून सुमारे 70 लाख प्रवासी त्यातून प्रवास करतात. सुमारे 18 हजार मार्गांवर एसटी धावते. पुणे विभागातून एक हजार बस दररोज धावत आहेत. येत्या 15 जूनपासून पुण्यातून ये-जा करणार्‍यांना प्रवाशांना किमान 30 रुपये ते कमाल 127 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. स्वारगेट-दादर शिवनेरी प्रवासासाठी 80 रुपये अधिक, पुणे-पणजी शिवशाही प्रवासासाठी 127 रुपये, पुणे-नाशिक शिवशाही प्रवासासाठी 62 रुपये, पुणे-कोल्हापूर शिवशाही प्रवासासाठी 69 रुपये, पुणे-महाबळेश्‍वर शिवशाहीसाठी 33 रुपये अधिकचे द्यावे लागतील.