Tue, Mar 19, 2019 05:22होमपेज › Pune › मराठा आंदोलनामुळे एसटी सेवा ठप्प

मराठा आंदोलनामुळे एसटी सेवा ठप्प

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:16AMपुणे ः प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाला आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी (दि.30) मराठा संघटनांच्या वतीने सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि सोलापूर विभागातील सर्व एसटी बसेसच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. तर चाकण, भीमाशंकर परिसरातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे परिसरातील एसटी  सेवा बंद करण्यात आली होती. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

आंदोलनामुळे पुणे विभागाच्या एसटी प्रशासनाने सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या सर्व फेर्‍या रद्द केल्या होत्या. तर सकाळपासूनच इंदापूर, भिगवण बसस्थानकातून पुण्याच्या दिशेने एकही बस सोडण्यात आली नाही. पुणे-सोलापूर महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलन होत असल्यामुळे, दोन्ही बाजूने एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच जिल्ह्यातील चाकणमध्ये मोर्चाला हिंसक वळण लागल्याने या मार्गावरून भीमाशंकर, नाशिककडे जाणारी एसटी वाहतूक  बंद करण्यात आली.

तसेच संगमनेर, नाशिककडे जाणारी एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागला. एसटीअभावी अनेक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. सोलापूरमध्ये आंदोलन तीव्र करण्यात आल्याने पुण्याच्या दिशेने एकही एसटी रवाना करण्यात आली नाही. दोन्ही बाजूच्या जवळपास 15 ते 25 फेर्‍या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की प्रशासनावर आली. एसटी सेवा खंडित झाल्याने प्रवाशांना इतर वाहनांचा पर्याय शोधताना तारेवरची कसरत करावी लागली. एसटीअभावी अनेकांना प्रवासच रद्द करावा लागला.   जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर परिसरात जमावाने तीव्र आंदोलन केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये काही गाड्या जाळण्यात आल्या. सुरक्षेच्यादृष्टीने या महामार्गावरील वाहतूकही सकाळी अकरानंतर बंद ठेवण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. नाशिक, भीमाशंकर, संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा, राजगुरुनगरकडे जाणार्‍या एसटीवर परिणाम झाला. 

हिंसक आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे लाखोंचे नुकसान 

राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. मागील काही दिवसांत विविध आगाराच्या एसटी तोडफोडीमुळे महामंडळाला लाखोंचा फटका सहन करावा लागला आहे. तसेच प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. सोमवारी पुणे सोलापूर मार्गावरील एसटी फेर्‍या रद्द केल्यामुळे पुणे विभागाचा 80 ते 90 हजारांचा महसूल बुडाला आहे. तर चाकणमध्ये आंदोलनादरम्यान काही एसट्यांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे आधीच तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दोन्ही विभाग मिळून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्वारगेट आगारप्रमुख प्रदीपकुमार कांबळे यांनी दिली आहे.

शिवाजीनगर आगार बस उभ्या

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी चाकण आणि राजगुरूनगर येथे आंदोलकांनी बंद पुकारला होता. त्यामुळे दुपारनंतर शिवाजीनगर आगारातून नाशिक, भीमाशंकर आणि संगमनेरसाठी सुटणार्‍या गाड्यांच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आगारात जागा मिळेल तिथे गाड्या लावण्यात आल्याने आगार अक्षरशः ठप्प झाले होते.

 नगरकडे जाणार्‍या 250 फेर्‍या रद्द

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगरकडे जाणार्‍या बहुतांश बसेसच्या 250फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या.   नगरसह बीड, औरंगाबाद, शिर्डीच्या दिशेने जाणार्‍या बहुतांश बसेस सोमवारी दुपारी 12 वाजेनंतर बंद करण्यात आल्या होत्या. बहुतांश प्रवाशांना एसटी न मिळाल्याने प्रवास रद्द  करावा लागला. तसेच अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या सर्व एसटी फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढावली होती.