Thu, Jul 18, 2019 08:09होमपेज › Pune › पुणे: तोडफोडीमुळे एसटीचे साडेसहा लाखांचे नुकसान 

पुणे: तोडफोडीमुळे एसटीचे साडेसहा लाखांचे नुकसान 

Published On: Jan 04 2018 4:01PM | Last Updated: Jan 04 2018 4:01PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर उसळलेल्या दंगलीमुळे गेल्या तीन दिवसांत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेवर चांगलाच परिणाम झाला. सोमवारी (दि. 1), मंगळवारी (दि. 2) व बुधवारी (दि. 3) मिळून पुणे विभागात तब्बल पंधरा एसटी बसेसची तोडफोड समाजकंटकांकडून करण्यात आली. यामध्ये एसटीचे तब्बल 6 लाख 58 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागात सोमवारी एसटीच्या तीन बसच्या काचांची तोडफोड करण्यात आली. तर मंगळवारी सात व बुधवारी पाच एसटींची तोडफोड केली गेली. यामध्ये काच व आसनांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. 

दरम्यान, सोमवारी व मंगळवारी एसटीच्या काहीच फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र बुधवारी महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर एसटीकडून सावधानता बाळगण्यात आली व पुण्यातून सुटणार्‍या 80 टक्क्यांहून अधिक फेर्‍या रद्द करण्यात आल्या. एसटीची सेवा बुधवारी संपूर्ण दिवस ठप्प असल्याने स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन या पुण्यातील प्रमुख आगारांत मिळून तब्बल 5 लाख 14 हजार 334 रुपयांचा महसूल बुडाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मंगळवारी व बुधवारी शिवाजीनगर व पुणे स्टेशन आगारात मिळून एसटीच्या तब्बल तीनशेच्यावर फेर्‍या रद्द करण्यात आल्या. तर स्वारगेट आगारात एसटीच्या दीडशेच्यावर फेर्‍या रद्द केल्या गेल्या. सुमारे एक लाख किलोमीटरच्या फेर्‍या दोन दिवसांत रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.