होमपेज › Pune › ग्रामीण भागात धावताहेत पन्नास बाद एसटी

ग्रामीण भागात धावताहेत पन्नास बाद एसटी

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:28AMपुणे : निमिष गोखले 

एसटीच्या पुणे विभागातील तब्बल 50 बस म्हातार्‍या झाल्या असून, त्यांना कामातून बाद करण्याच्या लायकीच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटी बसेसची वयोमर्यादा पंधरा वर्ष असून, त्यानंतर त्या बाद ठरविण्यात येतात आणि मार्गावर धावू शकत नाहीत. सद्यःस्थितीत 10 ते 15 वर्षादरम्यान तब्बल पन्नास एसटी मार्गावर धावत असून, यापैकी बहुसंख्य एसटी पुणे विभागातील ग्रामीण भागात धावत असल्याचे दिसून येते. या एसटी खिळखिळ्या झाल्या असून, अशा एसटी भर रस्त्यात बंद पडण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

पुणे विभागांतर्गत 13 आगार असून, एकूण बसेसची संख्या एक हजार एवढी आहे. दरम्यान, नवी कोरी एसटी ज्यावेळी मार्गावर येते, त्यावेळी ती हिरकणी म्हणून सुरुवातीची 6 वर्षे धावते. त्यानंतर तिला लाल डब्यात रुपांतरीत करण्यात येते व चार वर्षे शहरी भागांमध्ये ती धावते. एसटीला 10 वर्षे झाली, की तिला पुणे विभागातील ग्रामीण भागातील मार्गावर टाकण्यात येते, असा एसटी व्यवस्थापनाचा शिरस्ता झाला आहे. 

सध्या स्वारगेटहून पौड, मुळशी, पानशेत, भोर, वेल्हा मार्गावर धावणार्‍या जुन्या एसटींची संख्या प्रचंड असून, प्रवाशांना नाईलाजास्तव अशा खिळखिळ्या, गळक्या व आवाज करणार्‍या एसटीतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागाला एसटीकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळत असून, नव्या बसेस या मार्गावर सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत. दरम्यान, 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान आरटीओने 574 एसटी बसेसची पासिंग केली असून, 25 बसची पासिंग येत्या शनिवारी करण्यात येईल, अशी माहिती आरटीओच्या वतीने देण्यात आली. 

चालकाच्या हाती एसटी बस आल्यानंतर आगारात एक राउंड मारून त्याची तपासणी करणे, त्यात काही तांत्रिक दोष तर नाही ना, हे पाहणे बंधनकारक आहे. या बाबींची पूर्तता चालकांकडून करण्यात येते का हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

एक हजार बसमागे अवघे 70 मेकॅनिक

स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड आगारांसह पुणे विभागातील आगारातून दररोज एक हजार बस ये-जा करतात. मात्र एक हजार बसमागे अवघे 70 मेकॅनिक काम पाहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वारगेट एसटी आगारातील वर्कशॉप 10 हजार स्क्वेअर फुटावर वसले आहे. मात्र तेथे फक्त 20 ते 25 मेकॅनिक काम करत असून, ब्रेकडाउनची वाढती संख्या पाहता ही संख्या तोकडीच पडत आहे. त्याचप्रमाणे आताच्या मेकॅनिकची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे काहींनी बोलून दाखविले. 

एसटींमधील सर्व दोष दूर होतील

बारामती येथे आढावा घेतला गेला असून, पावसाळ्याच्या तोंडावर 7-8 दिवसांमध्ये एसटीचे वायपर, फ्लोअरिंग, छत दुरुस्त करण्यात येतील. जुन्या एसटींमधील दोष दूर होतील याची काळजी घेतली जाईल. यंदाच्या पावसाळ्यात बस गळणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. तसेच नादुरुस्त बस मार्गावर धावणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. 

-रवींद्र मोरे, प्रभारी विभाग नियंत्रक