Fri, Apr 26, 2019 04:04होमपेज › Pune › अघोषित बंदने प्रवाशांची तारांबळ

अघोषित बंदने प्रवाशांची तारांबळ

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी अचानक राज्यभरात पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. त्याचा फटका प्रवाशांना बसला. पुणे जिल्ह्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील एकूण 1352 फेर्‍या रद्द झाल्या.  शिवशाहीच्याही 216 फेर्‍या रद्द झाल्या. पर्यायी व्यवस्था नसल्याने  अनेक प्रवासी स्थानकातच अडकून पडले होते. स्वारगेट स्थानकात सुमारे 111 गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.  

आंदोलनाबाबत कर्मचार्‍यांनी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती तरी देखील  प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. आंदोलन कायम राहिल्यास  शनिवारी जादा फेर्‍यांसाठी प्रयत्न केले जातील.

एस.टी.चे 66 कर्मचारी बडतर्फ

एस.टी. संपात सामील झालेल्या राज्यातील 1588 कामगारांना निलंबित करण्यात आले असून, 66 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या संपामधील ही सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान, नांदेडमध्ये काही हिंसक घटना घडल्या. तर आपल्याला वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगत परळ आगारातील तीन कर्मचार्‍यांनी रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. 

शुक्रवारी मध्यरात्रीपासून झालेल्या या संपाची सर्वाधिक झळ उन्हाळी सुट्टी संपवून शाळेसाठी आपल्या गावाकडे परतणारे विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांना बसली. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत संपाचे परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवले. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 60 टक्के वाहतूक सुरू होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार्‍या 35,249 बस फेर्‍यांपैकी 10,397 फेर्‍या सुरळीत सुरू होत्या, असा दावाही परिवहन महामंडळाने केला. तर, या संपामुळे राज्यभरातील 85 टक्के सेवा कोलमडून पडल्याचा दावा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपल्याशी चर्चा न करता कर्मचार्‍यांची पगारवाढ केल्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटना या मान्यताप्राप्त युनियनने शुक्रवारी मध्यरात्रीपासून एस.टी.ची सेवा कोलमडून टाकली. मोबाईल मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅपव्दारे कर्मचार्‍यांना सामूहिक गैरहजर राहण्याचा संदेश पाठवून अनेक स्थानकांमधील बसेस उभ्या ठेवल्याने एस.टी.चा 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. या संपाची सरकारने दखल घेतली असून, राज्य परिवहन कर्मचार्‍यांना दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ मान्य नसल्यास ती रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच 15 तारखेपासून होणार्‍या प्रस्तावित तिकीट दरातील 18 टक्के वाढीचाही फेरविचार होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र एस.टी. कामगार काँग्रेस या संघटनेचे नेते श्रीरंग बरगे यांनी, राज्यातील 250 डेपोंपैकी 49 डेपो पूर्ण चालू होते, 58 डेपो पूर्ण बंद तर उर्वरित डेपोंमधून संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, असा दावा केला. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्के बसच्या फेर्‍या सुटल्या. राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 145 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. 80 आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही, असे सांगितले.

कुर्ला, परेल आगारांमधून सकाळपासून एकही बस सुटली नाही. तर नाशिक, शिरपूर, भिवंडी, चोपडा, उदगीर, वसई, पंढरपूर, पनवेल, चाळीसगाव, खेड, दापोली, गुहागर तसेच पुणे विभागातील इंदापूर, दौंड, शिरुर, तळेगाव, बारामती, भोर, नारायणगाव, स्वारगेट, शिवाजीनगर आगार बंद होते. ठाणे जिल्ह्यातील वाडा, शहापूर, मुरबाड आगारातून सकाळच्या बस सुटल्या. मात्र, ठाणे येथून सुटणार्‍या पनवेल, बोरिवली, भाईंदर या जिल्ह्यांतर्गत सेवा बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.