होमपेज › Pune › एसटी चालकांना मिळणार दुप्पट प्रोत्साहन भत्ता

एसटी चालकांना मिळणार दुप्पट प्रोत्साहन भत्ता

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 12:40AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने चालकांना यापुढे दुप्पट प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) मिळणार आहे. विनाअपघात बस चालविल्यास चालकांना ही रक्कम मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकही अपघात न होता एसटी बस चालविल्यास सहा महिन्याला चालकाला प्रत्येकी एक हजार रुपये तर वर्षाकाठी पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता सध्या मिळतो. आता हीच रक्कम दुप्पट होणार आहे. 

सुरक्षित प्रवासास एसटी कटिबद्ध असून शून्य अपघात पॉलिसी एसटी राबविणार असल्याची माहिती देण्यात आली. त्या अनुुषंगाने चालकांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांच्याकरिता योग शिबिरे, व्यायाम प्रकार सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असे सांगण्यात आले. 

2015-16 मध्ये एसटीचे 2920 लहान-मोठे अपघात झाले असून यामध्ये 445 जणांचा मृत्यू झाला. तर 2016-17 मध्ये 2772 अपघातांमधून 445 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी एसटीसाठी चिंतेची बाब ठरत असून अपघात रोखण्यास आता हा दुप्पट प्रोत्साहन भत्त्याचा फॉर्म्युला काम करतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दि. 28 जानेवारी रोजी शिवनेरीची डिकी अचानक उघडल्याने दोन पादचारी मृत्युमुखी पडले होते. ही मानवी चूकच असल्याचे त्या वेळी निष्पन्न झाले. 

एसटीच्या राज्यभर सुमारे 18 हजार बस असून 35 हजार चालक आहेत. दरम्यान, एसटीचा ब्रेक निकामी होणे, आग लागणे आदी तांत्रिक कारणांमुळे अपघात झाल्यास त्या चालकाला प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही, याबाबत एसटीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तांत्रिक कारणांमुळे अपघात घडल्यास ती चालकाची चूक असू शकत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.