Tue, Jan 22, 2019 08:32होमपेज › Pune › एसटी सेवा ठप्पच! प्रवाशांचे हाल सुरूच 

एसटी सेवा ठप्पच! प्रवाशांचे हाल सुरूच 

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 1:01AM
पुणे :

सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका गेल्या 10-12 दिवसांपासून  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला बसत असून, यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. बुधवारी (दि. 1) पुण्यातून नगर, औरंगाबाद व अन्य ठिकाणी बहुतांश एसटी सुरक्षेच्या कारणास्तव आगारातून सोडल्या नाहीत. शिवाजीनगर-नाशिक एसटी सेवा सलग तीन दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर एसटी सेवा सुरळीत होईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली. 

पुण्याच्या शिवाजीनगर आगारातून नगर, औरंगाबाद, जुन्नर, शिरूर, भीमाशंकर मार्गावर बुधवारी दिवसभरात एसटीची एकही गाडी मार्गस्थ झाली नाही, अशी माहिती शिवाजीनगर आगारप्रमुख ज्ञानेश्‍वर रणावरे यांनी दिली, तर शिवाजीनगर येथून नाशिककरिता सुटणारी शिवशाही, निमआराम व साध्या गाड्या सलग तीन दिवसांपासून सुटलेल्या नाहीत. शिवाजीनगर आगारातून नाशिककरिता एका बाजूने दररोज 33, भीमाशंकरसाठी 15, औरंगाबादकरिता 20 बस सोडण्यात येतात. या सर्व बस बुधवारी बंद होत्या. दरम्यान, पुण्याहून पणजी, मुंबई व पुण्यातील ग्रामीण भागातील मुक्कामी गाड्या व अन्य मार्गांवरील; तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील एसटी सेवा बुधवारी सुरळीत होती, असा दावा करण्यात आला. 

आजही एसटी बसेस आगारातच?
पुण्यातून बाहेरगावी जाणार्‍या बहुतांश एसटी आजदेखील (गुरुवार, दि. 2) आगारातच राहण्याची शक्यता आहे. नाशिक, औरंगाबाद, नगर, जुन्नर येथून बुधवारी एसटी परतल्या नसल्याने पुण्यातूनही गुरुवारी त्या सोडणे शक्य नाही. त्याचप्रमाणे सध्या आंदोलनामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर, नाशिक, नगर, औरंगाबाद या चार शहरांतील एसटी वाहतूक गुरुवारीदेखील बंद राहण्याची शक्यता आहे. 

70 फेर्‍या रद्द
शिवाजीनगर आगारातून एसटीच्या सुमारे 70 फेर्‍या बुधवारी रद्द करण्यात आल्या. दि.20 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुणे विभागात सुमारे 80 लाख रुपयांचा महसूल बुडाला. गेल्या 10-12 दिवसांत एसटीची तोडफोड, जाळपोळीमुळे पुणे विभागात तब्बल दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर राज्यात आतापर्यंत 23 कोटींचा महसूल बुडाला असून, सुमारे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.