Sun, Mar 24, 2019 23:32
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ज्येष्ठांची एसटी बस सवलत लालफितीत

ज्येष्ठांची एसटी बस सवलत लालफितीत

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:31AMपुणे : निमिष गोखले

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सवलत दिली जाते. त्यासाठी 65 वर्षाची वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र, नुकताच सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 60 वर्षे केली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाला याबाबत कोणत्याही निर्णयाचे परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला खोडा निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय विभाग आणि एसटी महामंडळाच्या लालफितीतील कारभारामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा ज्येष्ठांना करावी लागत आहे. 

सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वरून 60 वर्ष केले. जुलै महिन्यात याबाबतचा निर्णयही झाला. परंतु ऑगस्टअखेर आला तरीदेखील या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसून एसटीला लेखी आदेश न मिळाल्याने 65 वर्ष व त्यापुढील ज्येष्ठांनाच अद्याप ही सवलत मिळत असल्याचे दिसते. 60 ते 65 दरम्यान वय असणार्‍यांना अजूनही सवलतीचा लाभ मिळत नसून त्यामुळे साधी, निमआराम, शिवशाही, परिवर्तन बसमधून त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागत आहेत. 

65 वरून 60 वयोमर्यादेचा निर्णय कागदपत्रांच्या कचाट्यात सापडला असल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ज्येष्ठांना दिलेल्या भाडेसवलतीची जवळपास 575 कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारने एसटी महामंडळाला देणे बाकी आहे. मात्र, तरीदेखील एसटीकडून 65 वर्षांच्या पुढे विनातक्रार सवलत योजना देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. 

पुणे विभागाला आदेश नाही
सामाजिक न्याय विभागाकडून मुंबई कार्यालयाला अध्यादेश पाठविले गेल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी होईल. सद्यःस्थितीत असा कोणताही आदेश आम्हाला आला नसून त्यामुळे एसटी प्रवासाकरिता 65 वर्षाच्या पुढेच सवलत दिली जात आहे.     -यामिनी जोशी, विभाग नियंत्रक 

अध्यादेश मिळाल्यानंतर सवलत
सामाजिक न्याय विभागाकडून एसटी महामंडळाला अध्यादेश मिळालेला नाही. अध्यादेश मिळाल्यानंतर तो मंजूर होईल. पैशांचे वाटप झाल्यानंतरच 60 वर्षावरील ज्येष्ठांना सवलत दिली जाईल. -अभिजित भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी, मुंबई