Mon, Aug 19, 2019 11:30होमपेज › Pune › बारामतीलाही एसटीचे विभागीय कार्यालय

बारामतीलाही एसटीचे विभागीय कार्यालय

Published On: Jul 14 2018 8:32PM | Last Updated: Jul 14 2018 8:31PMपुणे : प्रतिनिधी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यालयांमध्ये आता बारामती विभागाची भर पडणार आहे. पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारा संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे. त्यामुळे एसटीच्या विभागीय कार्यालयाची संख्या आता एकूण ३२ होणार आहे.

एसटी महामंडळाची सध्या राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी ३१ विभागीय कार्यालये आहेत. प्रशासकीय विभागानुसार मुंबई विभागात ६, पुणे विभागात ५, नाशिक विभागात ४, औरंगाबाद विभागात ७, अमराती विभागात ४ तर नागपूर विभागात ५ असे विभाग आहेत. या ३१ विभागांतर्गत २४७ आगार तर ५७८ बसस्थानके येतात. या विभागांमध्ये आता लवकरच बारामती विभागाची भर पडणार आहे. 

पुणे विभागामध्ये सध्या बारामती आगाराचे उत्पन्न इतर आगारांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभागातील प्रवासी संख्याही देखील अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पुण्यासह सातारा व सोलापूर विभागातील काही आगार वेगळे करून बारामती हा नवीन विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित होते. या प्रस्तावाला पुन्हा चालना मिळाली असून संबंधित विभाग नियंत्रकांकडून याबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. महामंडळाच्या वाहतुक विभागाने पुणे विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रानुसार, बारामती येथे विभागीय कार्यालय कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. पुणे विभागातील बारामती, बारामती एमआयडीसी, दौंड, इंदापूर, शिरूर, सोलापूर विभागातील करमाळा व अकलूज तर सातारा विभागातील फलटण असे एकुण ८ आगार प्रस्तावित करण्यात आले आहेत.