Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Pune › पुणे : एसटीच्या २३ संपकर्‍यांना ‘डबल घंटी’

पुणे : एसटीच्या २३ संपकर्‍यांना ‘डबल घंटी’

Published On: Jun 20 2018 6:25PM | Last Updated: Jun 20 2018 6:25PMपुणे: प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांकडून विविध मागण्यांसाठी ८ ते ९ जूनदरम्यान अचानक संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची सेवा खंडीत झाली होती. परिणामी राज्यासह पुण्यातील लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसला. दरम्यान, प्रशासनाच्या माहितीनुसार विविध संघटनांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता संप पुकारल्याने महामंडळाने संपात सहभागी असणार्‍या पुणे विभागातील २३ कर्मचार्‍यांची कामावरून हकालपट्टी केली आहे. 

राज्यासह पुण्यातील बहुतांश एसटी संघटनांनी संपात सहभाग घेतला होता. या संपकाळात पुणे जिल्ह्यासह शहरात कार्यरत असलेल्या १३ आगारातील कर्मचार्‍यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे एसटीची वाहतूक पूर्णतः कोलमडली होती. परिणामी सर्वच आगारांमध्ये असणार्‍या एक हजार गाड्यांच्या प्रतिदिनी ६ हजार फेर्‍या रद्द झाल्या होत्या. दरम्यान, संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. संपकाळात सहभागी नवीन चालक कम वाहक, सहायक व अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळात  कर्तव्यास लागलेल्या कर्मचार्‍यांच्या सेवा तात्काळ समाप्ती करण्याच्या सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांचा आदेश प्राप्त होताच संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर सेवा मुक्त करण्याचे आदेश विभागाने बजावले आहेत. पुणे विभागातील तब्बल १८ संपकरी कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले असून ५ संपकरी कर्मचार्‍यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. 

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ विभागाकडून प्राप्त आदेशानुसार ८ ते ९ जूनदरम्यान संपात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांना वेठीस धरून संप पुकारल्याने कारवाई करण्यात आली असून पुणे विभागातील २३ कर्मचार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. 

संपकाळात तब्बल दीड कोटींचे नुकसान

एसटी कर्मचार्‍यांच्या संप काळात पुणे विभागातील बहुतांश गाड्या विभागात उभ्या होत्या. अनेक फेर्‍या रद्द झाल्याने विभागाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक उपद्रवी लोकांनी तोडफोड करत एसटी महामंडळाच्या मालमत्तेचे नुकसान केले असून त्यामध्ये एसटीच्या काचा फोडणे, गाडीची हवा सोडणे, आदी प्रकारांचा समावेश आहे.