Sun, Jul 21, 2019 17:03
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › दहावी -बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी -बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील वर्षी बुधवार दि. २१ फेब्रुवारी २०१८ ते मंगळवार दि. २० मार्च २०१८ या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल. तर दहावीच्या परीक्षेसाठी १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

 राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बोर्डाची परीक्षा घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. संभाव्य  वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेसाठी साधारण तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. परंतु, गेल्यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका यांच्या निवडणुकांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्यावेळी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांमध्ये अडसर येत असतानाच प्रवेशपत्रांमध्ये चुका असल्याची बाब समोर आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये, विषयांमध्ये तर उत्तर लिहिण्याच्या माध्यमामध्ये चुका असल्याचे समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेतल्या होत्या.

यंदा देखील १८ सप्टेंबर रोजी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. तसेच यावर आक्षेप तसेच सुचना मागविण्यात आल्या होत्या. आलेल्या सुचनांनुसार वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता सुधारीत सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.mahaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार असून हे संभाव्य वेळापत्रक आहे. परीक्षेपूर्वी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडे येणा-या अंतिम वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खातरजमा करून घ्यावी, तसेच व्हॉट्स ऍप किंवा तत्सम कोणत्याही मार्गाने आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. तसेच यंदा परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षा संपेपर्यंत कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षागृहाच्या बाहेर सोडले जाणार नसल्याचे देखील मंडळाकडून कळविण्यात आले आहे.