Sat, Apr 20, 2019 10:15होमपेज › Pune › ‘एसएफआय’अध्यक्षाने केला विद्यापीठात राडा

‘एसएफआय’अध्यक्षाने केला विद्यापीठात राडा

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 9 मध्ये स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) विद्यापीठ अध्यक्ष सतीश देबडे याने मंगळवारी रात्री दारू पिउन रुमच्या काचा फोडून गोंधळ केल्याचे प्रत्यक्षदर्शी सुरक्षारक्षक, विद्यापीठ प्रशासनाचे अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आपण हा प्रकार दारू पिउन केला नसल्याचे देबडे याने सांगितले. या प्रकारामुळे देशात नवव्या क्रमांकावर असणार्‍या विद्यापीठाची अंतर्गत सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

देबडे याने विद्यापीठात मंगळवारी रात्री अकरा वाजता वसतिगृहाच्या खोली क्र. 402 च्या काचा फोडल्या आणि गोंधळ घातला. देबडे हा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात पीएचडी करीत आहे. काचा फोडल्याने देबडे यांच्या हाताला इजा झाल्याने फरशीवर रक्त सांडले होते. या गोंधळाची तीव्रता एवढी जास्त होती की, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी, पोलिस आणि वसतिगृहप्रमुख डॉ. टी. डी. निकम यांना यावे लागले होते. त्यानंतर घटनेची तीव्रता लक्षात घेऊन निकम आणि सुरक्षारक्षक यांनी देबडे याला रुग्णालयात येण्याची विनंती केली असता त्याने नकार दिला. दरम्यान, या प्रकरणामुळे विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली आहे. याबाबत देबडे याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माझ्या रूमची काच अनावधानावे फुटली आहे. मात्र, याचा अर्थ मी दारु पिउन धिंगाणा घातला आणि विद्यार्थ्यांमध्ये भय निर्माण केले, हे पूर्णपणे खोटे आहे. वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातून सत्य पुढे येईल. फुटलेल्या काचाबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून जो काही दंड होईल तो मान्य असेल. याबाबत विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात शिकणारा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे म्हणाला की, मंगळवारी रात्री देबडे आणि त्याचा मित्र दारू पिउन होता. त्यानंतर दारुच्या नशेतच त्याने काचा फोडल्या. काही वेळात देबडे याचा अवतार सुरक्षारक्षक, विद्यापीठ प्रशासनाचे अधिकारी, पोलिस आणि विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी पाहीला. त्यामुळे विद्यापीठाने देबडेवर तत्काळ कारवाई करावी. तर विद्यापीठ  प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार देबडे याने वसतिगृह क्रमांक 9 मध्ये तोडफोड केली. तसेच, आरडाओरडा करून गोंधळ घातला. यामध्ये विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

याबाबत विद्यापीठाचे अधिकारी आणि सुरक्षारक्षक अधिक तपासणी करीत असताना देबडे याने प्रशासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून कारवाई करण्याची विनंती केली आहे.