Thu, Apr 25, 2019 08:09होमपेज › Pune › पुणेकरांच्या वाटच्या निम्म्या पाण्यावर नियमांचे संकट!

पुणेकरांच्या वाटच्या निम्म्या पाण्यावर नियमांचे संकट!

Published On: May 11 2018 1:25AM | Last Updated: May 11 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी

पुणेकरांच्या पाण्यामागील शुल्ककाष्ठ काही संपण्यास तयार नाही. जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी पुणेकरांना पाण्याची उधळपट्टी टाळून जपून वापराचे आवाहन केल्याला चार दिवस उलटत नाही तोच आता त्यांच्या खात्याने नियमांवर बोट ठेवले आहे. जलसंपदा विभागाने महापालिका आणि पाटंबधारे खात्याला 31 मेपर्यंत पुणेकरांच्या पाणी वापरासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याच्या यापूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने आता कारवाईचा बडगा उगारण्याची भीती दाखविली गेली आहे. भविष्यात या आदेशानुसार पुण्याला पाणीपुरवठा झाला तर पुणेकरांना सध्या मिळत असलेल्या पाण्यापेक्षा निम्मेच पाणी वाट्याल येण्याची शक्यता आहे. 

पुणे शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात मापदंडानुसार पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागाचे प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांच्याकडे केली होती. त्यावर निकाल देताना जलसंपदा विभागाने महापालिकेला लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा करावा, असे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने जराड यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांना समन्स बजावून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याच्या आदेशावर केलेल्या कार्यवाहीचे प्रतिज्ञापत्र 5 मेपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. मात्र, महापालिका व पाटबंधारे खात्याने हे प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने जलसंपदा विभागाने आता जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दंड व आकार बसविण्याच्या तयारीत आहे. हा हवाला देत आता जलसंपदा विभागाने 31 मेपर्यंत पाणी वापराचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अंतिम मुदत पालिका  पाटबंधारे विभागाला दिली आहे. मात्र, पालिकेने या निर्णयाविरोधात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याआधीच अपिल केले आहे.

... तर रोज नव्हे दिवसाआड पाणी पुरवठा

शहराची 2017 ची लोकसंख्या 39 लाख 18 हजार इतकी आहे. त्यानुसार प्रतिव्यक्ती 150 लिटरप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात  पालिकेला खडकवासला धरनातून केवळ 8.19 टीएमसी इतकेच पाणी मिळू शकेल. महापालिका सद्यस्थितीला या धरणातून वर्षाला 15 टीएमसी इतके पाणी उचलते. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार कार्यवाही केल्यास शहराच्या पाणी पुरवठ्यात तब्बल टे81 टीएमसीची कपात करावी लागणार आहे. तसे केल्यास शहराला सध्या रोज होणारा पाणीपुरवठा दोन दिवसातून एकच दिवस करावा लागेल. आता पुणेकरांच्या पाण्याचे भवितव्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या हाती आहे.