Sun, Feb 17, 2019 03:37होमपेज › Pune › शाळकरी मुलींना ५ रुपयांत सॅनिटरी नॅपकीन

शाळकरी मुलींना ५ रुपयांत सॅनिटरी नॅपकीन

Published On: Jan 27 2018 8:27PM | Last Updated: Jan 27 2018 8:25PMपुणे : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्रात मुलींच्या मासिक पाळीतील स्‍वच्‍छतेच्या दिशेने महत्त्‍वाचे पाऊल टाकले आहे. जिल्‍हा परिषदच्या शाळेतील मुलींना वर्षभरासाठी लागणारी सॅनिटरी नॅपकीन सरकारकडून केवळ ५ रुपयांना दिली जाणार आहेत. ज्या विद्यार्थीनींजवळ आधार कार्ड आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे ग्रामीण विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे स्‍थानिक स्‍वयं सहाय्‍यता गटांमार्फत सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करण्याबाबत प्रस्‍ताव तयार करण्यात आला आहे. विद्यार्थीनींना परवडणार्‍या दरात, मुबलक प्रमाणात आणि स्‍वीकार्ह असे सॅनिटरी नॅपकीन उपलब्‍ध करून देऊन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न हाताळणार असल्याचे मुंडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

'अस्‍मिता' या नावाने हा प्रस्‍ताव तयार करण्यात आला असून आगामी कॅबिनेट बैठकीत तो ठेवण्यात येणार आहे. प्रस्‍तावास मंजुरी मिळाल्यानंतर आम्‍ही सर्व आधारधारक विद्यार्थीनींसाठी नॅपकीनचा पुरवठा सुरू करणार आहोत. शाळेच्या परिसरातच नॅपकीन मिळण्याची सोय करणार असून वर्ष संपल्यानंतरही नॅपकीन दिले जाईल, असे मुंडे यांनी सांगितले. 

या सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा आधार कार्डद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीला नॅपकीन मिळेल आणि त्यामुळे शाळेतील अधिकार्‍यांना वाटपातील सत्यता तपासता येईल. तसेच स्‍थानिक स्‍वयंसहाय्‍यता गट पूर्वीपासूनच लहान स्‍तरावर हा उपक्रम चालवत आहेत. त्यामुळे या योजनेत सुलभता येण्यासाठी या गटांची निवड करण्यात आली आहे, असे मुंडे यांनी सांगितले. 

स्‍वयंसहाय्‍यता गटांना या सेवेतून नफा मिळणार आहे. त्यांना ग्रामविकास विभागाकडून चांगल्या नॅपकीनच्या पुरवठ्यासाठी २५ ते २७ रुपये देण्यात येणार आहेत. सध्या बाजारात सॅनिटरी नॅपकीनची किंमत ४० रुपयांच्यावर आहे. कमी किंमत आणि चांगला दर्जा यामुळे आम्‍ही आशा करतो की विद्यार्थीनी नॅपकीन वापरतील. 

तसेच या उपक्रमातून परिसरातील महिलांनाही हे नॅपकीन २५ ते २७ रुपयांना मिळतील. ही योजना सुरुवातीच्या काळात केवळ जिल्‍हा परिषद शाळांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर ती खासगी आणि इतर शाळांमध्ये सुरू केली जाईल असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.