Thu, Apr 25, 2019 18:30होमपेज › Pune › तीन कोटींच्या जुन्या नोटा बदलण्याचा डाव

तीन कोटींच्या जुन्या नोटा बदलण्याचा डाव

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी 

बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी येथील रविवार पेठेत आलेल्या संगमनेर येथील काँग्रेसच्या नगरसेवकासह पाच जणांना खडक पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडले. जप्त करण्यात आलेली रोकड दोन कोटी 99 लाख रुपये आहे. नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग (47, रा. संगमनेर, जि. अहमदनगर), विजय अभिमन्यू शिंदे (38, रा. वाकडेवाडी, पुणे-मुंबई रस्ता), अदित्य विश्वास चव्हाण (25, भूगाव, ता. मुळशी), सुरेश पांडुरंग जगताप (40, रा. खराडेवाडी, ता. फलटण), नवनाथ काशिनाथ भडांगळे (28, रा. कर्वेनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

खडक पोलिस ठाण्याचे तपास पथक रविवार पेठेतील बंदीवान मारुती मंदिर चौक भागात गस्त घालत होते. त्यावेळी तपास पथकातील साहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार यांना माहिती मिळाली की, बाद झालेल्या नोटा घेऊन काहीजण येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या सूचनेनुसार पथकाने अभंग याच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अभंगनी काही जणांकडून बदलून देण्यासाठी नोटा घेतल्या होत्या. त्यावर टक्केवारीपोटी काही रक्कम त्यांना मिळणार होती. नोटा बदलून कोण देणार होते, यादृष्टीने तपास सुरू असल्याचे मोकाशी यांनी सांगितले.  साहायक निरीक्षक वैभव पवार, कर्मचारी गणेश माळी, महेश बारवकर, सागर केकाण, नदाफ, क्षीरसागर, तुषार माळवदकर यांनी ही कारवाई केली.