Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Pune › राज्यात ११ हजार १३० कोटी रुपयांची कर्जमाफी

राज्यात ११ हजार १३० कोटी रुपयांची कर्जमाफी

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:12AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेत पात्र लाभार्थ्यांची चौथी हिरवी यादी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार 2 हजार 519 कोटी 49 लाख रुपये हे शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येत आहेत. तर आत्तापर्यंतचा एकूण कर्जमाफीचा आकडा 11 हजार 130 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कर्जमाफीच्या एकूण लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या सुमारे 33 लाख 76 हजार इतकी झाल्याची माहिती सहकार विभागातून गुरुवारी मिळाली.

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखापर्यंतच्या थकीत कर्जदारांचे अर्ज  ऑनलाइन भरून घेण्यात आले आहेत. राज्यातून एकूण 56 लाख 59 हजार 187 शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अद्यापही 22 लाख 83 हजार 187 शेतकर्‍यांना प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होते.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात 671.16 कोटी, दुसर्‍या टप्प्यात 6 हजार 120.45 कोटी, तिसर्‍या टप्प्यात 1 हजार 819.01 कोटी आणि चौथ्या टप्प्यात 2 हजार 519.49 कोटी मिळून 11 हजार 130 कोटी रुपये शासनाने बँकांच्या खात्यावर जमा केलेले आहेत. त्यामध्ये 33 राष्ट्रीयकृत व व्यापारी बँका आणि 30 जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश असल्याचे सांगून सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांना 6 हजार 997 कोटी 69 लाख रुपये आणि जिल्हा बँकांना 4 हजार 132 कोटी 43 लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफीची रक्कम देण्यापूर्वी मूळ कर्जाची रक्कम, आयएफएससी कोड आदींसह अन्य अनुषंगिक माहिती खातेदारनिहाय लेखापरिक्षकांकडून तपासणी करुन घेण्याच्या सूचना मंत्रालय स्तरावरुन प्राप्त झालेल्या आहेत. त्याची तपासणी बँकांकडून गेली दोन दिवस सुरु असून शुक्रवारी (दि. 8) सायंकाळपर्यंत ही रक्कम शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जमा होण्याची अपेक्षा आहे.

प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार...

कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्यातील हिरव्या यादीचा विचार करता 2 हजार 519 कोटीपैकी जिल्हा बँकांना सुमारे 800 कोटी रुपयांइतकी रक्कम देण्यात आलेली आहे. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी 25 टक्के प्रोत्साहनपर रक्कम बचत खात्यावर जमा करण्यात येणार आहे. जिल्हा बँकांकडील उपलब्ध झालेल्या कर्जमाफीच्या रकमेतून प्रोत्साहनपर रक्कम प्रथमच उपलब्ध झालेली असल्याची माहितीही सहकार विभागातील सूत्रांनी दिली.