Thu, May 23, 2019 14:33
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › चंद्रावरील संशोधनासाठी आनंद बनवणार रोबोट

चंद्रावरील संशोधनासाठी आनंद बनवणार रोबोट

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 1:08AMपुणे :

मूळचा पुणेकर असलेल्या आनंद ललवाणीने नासासाठी 4 इंचाचा सॅटेलाईट (उपग्रह) साकारला आहे. नासाने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या निर्मितीत त्याचा समावेश होता.  22 वर्षीय आनंदचे लक्ष्य आता चंद्रावरील संशोधनासाठी  रोबोट्सची निर्मिती करणे हे असणार आहे. 

अमेरिकेत आनंद ललवाणीने नासासाठी सॅटेलाईटची निर्मिती करून भारताचे नाव मोठे केले. भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घेऊन जगात भारताचे नाव मोठे करावे, यासाठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत  माजी कुलगुरू वासुदेव गाडे यांनी वरील माहिती दिली.  यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, सॅटेलाईट निर्माता आनंद ललवाणी याची आई संगीत, वडील विकास ललवाणी उपस्थित होते.

आनंदचे 10 वी पर्यंतचे शिक्षण पुण्यातील सिंबॉयोसिस विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी आनंद अमेरिकेत गेला. त्यानंतर त्याने उपग्रह निर्मितीत सहभाग घेत नासासाठी ‘इक्विसेट’ या विद्यार्थी उपग्रहाची निर्मिती केली. सोमवार, 20 मे 2018 रोजी नासाने अर्थात दि नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने व्हर्जिनिया येथील आइसलँड येथून ‘इक्विसॅट’ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

एका गिफ्ट बॉक्सइतकाच जवळ जवळ 4 इंच एवढाच या उपग्रहाचा आकार असून नासाच्या क्युबसॅट लाँच इनिशिटीव्ह अंतर्गत ब्राऊन स्पेस इंजिनीअरिंग या गटाने त्याची निर्मिती केली. हा उपग्रह बनविताना 3 हजार 600 डॉलर इतकाच खर्च आला. ‘इक्विसेट’ या प्रकल्पासाठी एकूण 5 गट कार्यरत होते. ज्यापैकी 17 विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्त्व हे आनंद ललवाणीकडे होते. त्यांच्या टीमने मुख्यतः सोलर पॉवर आणि बॅटरी निर्मितीचे काम पाहिले. सध्या आनंद इंजिनीअरिंग रिसर्च असिस्टंट म्हणून ब्राउन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असून, भविष्यात त्याला स्टॅनफर्ड विद्यापीठातून सोलर एनर्जी याविषयात पीएचडीचे शिक्षण घ्यायचे आहे.