Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Pune › एसटी बंदचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट

एसटी बंदचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट

Published On: Jun 09 2018 1:51AM | Last Updated: Jun 09 2018 1:49AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने कर्मचार्‍यांची अपेक्षित पगारवाढ न केल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी अचाकन बंद पुकारला. याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाले आणि खासगी वाहनचालकांनी अवाच्या सवा दर लावत प्रवाशांची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बंदचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट झाली. स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी तासन्तास उभे होते. याचा फायदा घेत काही एजंट स्वारगेट स्थानकात येऊन प्रवाशांना, बाहेर गाडी उभी आहे आणि तुम्हाला एसटी बंद असल्याने आमच्या गाड्यांशिवाय पर्याय नाही, असे सांगत प्रवाशांची लूट करत होते. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी स्वारगेट स्थानकाबाहेर खाजगी वाहने उभी होती.  सोलापूर 500 रुपये, सांगली 400, सातारा 400, मुंबई 500, कोल्हापूर 500 असे दर आकारत होते.

बंदमुळे एसटीचा 15 कोटींचा महसूल बुडाला

एसटी कर्मचार्‍यांच्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या संपामुळे एसटीचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. दिवसभरात राज्यातील 250 आगारांतून सुमारे 30 टक्के बसफेर्‍या सुटल्या, राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होती. तसेच 145 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. राज्यातील 80 आगारांतून दिवसभरात एकही बसची फेरी झाली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 60 टक्के वाहतूक सुरू होती. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणार्‍या 35,249 बस फेर्‍यांपैकी 10,397 फेर्‍या सुरळीत सुरू होत्या.